03 December, 2022

 विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून स्वतःची ओळख निर्माण करावी

 -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर






            हिंगोली (जिमाका), दि. 03 : विद्यार्थ्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करुन स्वतःची ओळख निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदर्श महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले. 

            येथील आदर्श महाविद्यालयात मतदार यादीत नाव नोंदणी संदर्भात विद्यार्थ्यांचे शिबिर आज दि. 3 डिसेंबर, 2022 रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.पापळकर बोलत होते.यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य विलास आघाव यांची उपस्थिती होती. 

            जिल्हाधिकारी श्री. पापळकर पुढे म्हणाले की, मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या मतदारांना आता नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. सर्व मतदारांनी या अर्हता दिनांकावर आधारित नाव नोंदणी पूर्ण करावी. सतरा वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील वर्ग शिक्षकाकडे नाव नोंदणीचे फॉर्म भरुन द्यावेत. त्यासोबत स्वतःचा जन्म तारखेचा पुरावा, कुटुंबातील एका व्यक्तीचे मतदान ओळखपत्राची प्रत व आधार कार्ड जोडून मतदार नोंदणी करावी. संबंधित वर्गशिक्षक यांनी प्राचार्यामार्फत तहसील कार्यालयामध्ये नाव नोंदणीचे फॉर्म दाखल करावेत. वरील नमूद चार अर्हता दिनांकावर आधारित अठरा वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींचे मतदार यादीत नाव नोंदणी आता करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

              मतदार यादीत नाव नोंदणी ऑफलाइन पद्धतीने नमुना सहा हा फॉर्म भरुन करता येईल. त्याबरोबरच वोटर हेल्पलाइन ॲपमधून ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करता येईल, असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले. 

           यावेळी आदर्श महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

                     ****

No comments: