02 January, 2026
आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त अर्जांची छाननी करण्यासाठी पथकांची नियुक्ती
हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि. 24 डिसेंबर, 2025 ते दि. 2 जानेवारी, 2026 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राप्त अर्जांची दि. 5 व 6 जानेवारी, 2026 रोजी छाननी करण्यात येणार असून ही कार्यवाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) केशव गड्डापोड व शिक्षणाधिकारी (मा.) संदीपकुमार सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
पथकात नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. 5 व 6 जानेवारी, 2026 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त सर्व अर्जांची छाननी पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान गोपनीयता बाळगणे अत्यावश्यक असून कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी छाननीच्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच अर्ज छाननीसाठी गैरहजर राहणाऱ्या, निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 अन्वये शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशी गंभीर सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची तात्काळ व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment