04 January, 2026

औंढा नागनाथ येथे भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन-अभिषेक सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा

• जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केली मंदिर परिसराची पाहणी हिंगोली, दि. ०४ (जिमाका) : येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र नागनाथ मंदिरास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकतीच भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, मंदिर अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, तलाठी गजानन गुंजकर, बबन सोनुने, तुळजादास भोपी, पद्माक्ष पाठक, अभिजीत लोखंडे, कृष्ण ऋषी, तसेच कर्मचारी - पुरोहित उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंदिर कर्मचारी व पुजारी-पुरोहितांची बैठक घेऊन विकासकामे, भाविकांसाठी उपलब्ध सोयी-सुविधा तसेच भावी नियोजनाचा आढावा घेतला. राज्यासह परराज्यातील भाविकांना श्री नागनाथाचे दर्शन अधिक सुलभ व्हावे, यासाठी ऑनलाईन दर्शन व अभिषेक बुकिंग प्रणाली अधिक सक्षम करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावरून दर्शन आणि विविध अभिषेकांची बुकिंग करता येणार आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांसाठी दर्शनासाठी स्वतंत्र रांग व्यवस्था राहणार आहे. अभिषेक बुकिंग केलेल्या भाविकांचा अभिषेक पुजारी-पुरोहितांकडून चक्रीय पद्धतीने करण्यात येणार असून, अभिषेकाच्या रकमा निश्चित करण्यात येणार आहेत. भाविकाला मंदिरात आल्यानंतर अभिषेक करण्यासाठी ऑनलाईनच बुकिंग करणे बंधनकारक राहणार आहे. सर्व बुकिंग, दिनविशेष व उपलब्ध वेळापत्रक ऑनलाईन स्वरूपात भाविकांना पाहता येणार आहे. याशिवाय मंदिर परिसर व देवतांची माहिती भाविकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार आहे. पुढील काळात व्यापारी संकुल, वाहनतळ व्यवस्था, ज्योतिर्लिंग पार्क, संग्रहालय, हरिहर तलावावर लेझर साऊंड शो, अहिल्यादेवी पुतळा परिसर विकास आदी विविध विकासकामे प्रस्तावित आहेत. सध्या मंदिरात सुरू असलेले प्रसादालय भविष्यात मंदिराच्या बाहेरील परिसरात स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री नागनाथ मंदिरासह परिसरातील विसोबा खेचर मंदिर व चिंतामणी मंदिराचीही पाहणी केली. ******

No comments: