02 January, 2026
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे, सर्व तालुका कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील सोयाबीन, हळद व इतर पिकांच्या उत्पादनासाठी प्रती हेक्टर येणाऱ्या खर्चाबाबत चर्चा केली. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यातील 148 गावांमध्ये योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी गावनिहाय हवामान अनुकूल आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगितले. हा प्रकल्प तीन घटकांमध्ये राबविण्यात येत असून योजनेसाठी आतापर्यंत 7 हजार 89 अर्ज प्राप्त झाले आहेत.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, वृक्ष व बांबू लागवड, गांडूळ खत युनिट, पाईप व पंप संच, शेडनेट गृहातील लागवड साहित्य, रेशीम उद्योग, मत्स्यपालन, शेळीपालन, मृद व जलसंधारण तसेच एनआरएम अंतर्गत विविध कामांचा समावेश आहे. ही कामे करताना प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग फोटो व युनिक आयडी तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या.
यावेळी रब्बी पेरणी, गतवर्षीच्या पीक विमा वाटपाची सद्यस्थिती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, ॲग्रीस्टॅक योजना, कडधान्य व पौष्टिक तृणधान्य योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, वैयक्तिक शेततळे, स्मार्ट प्रकल्प, सूक्ष्म सिंचन तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान या योजनांचा आढावा घेण्यात आला.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा अनुदान वाटपाची स्थिती तपासून जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित पीक विमा कंपनीने 15 जानेवारीपर्यंत विमा अनुदानाचे वाटप पूर्ण करावे, अन्यथा संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment