26 January, 2020



पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला ‘संविधान उद्देशिका’ वाचन उपक्रमांचा शुभारंभ

हिंगोली, दि.26: विद्यार्थ्यांवर शालेय जीवनापासूनच समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता हे पंचसुत्री संविधानिक संस्कार करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन उपक्रमाची अंमलबजावणी प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 
त्यानुसार आज येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाळेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थीनी, शालेय शिक्षकवृंद आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘संविधान उद्देशिका’ वाचन करुन या उपक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खा. राजीव सातव, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड आदींची उपस्थिती होती.

****





पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ

हिंगोली, दि.26 : राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तिंसाठी केवळ 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात करीता  ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. या ‘शिवभोजन’ योजनेची पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
त्याअनुषंगाने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते येथील जिल्हा रुग्णालय परिसरात ‘शिवभोजन’ केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शिवभोजन थाळी वितरीत करण्यात आली. पुढील टप्प्यात जिल्ह्यात शिवभोजन केंद्राची सुरुवात करण्यात येणार असून, या योजनेमुळे गरीब व गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची सोय होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यावेळी माजी. खा. राजीव सातव, माजी. आ. डॉ. सतीश टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
****






पारदर्शक कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकरी बांधव चिंतामुक्त होणार
                                                                        - पालकमंत्री वर्षा गायकवाड
हिंगोली, दि.26: राज्यातील शेतकऱ्यांसाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा राज्य शासनाने केली असून यामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच चिंतामुक्त होतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
            भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापन दिनी आज येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकूळे, माजी. खा. राजीव सातव, माजी. आ. डॉ. सतीश टारफे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
 यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की,  लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी, 1950 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. आणि जगामध्ये भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. लोकशाही तंत्राच्या घटनेनूसार देशाचा कारभार सुरु झाला. नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस विदितच आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी अमूल्य योगदान लाभले. त्यामुळेच आज जगात भारतीय लोकशाही श्रेष्ठ ठरली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी सहज, सोपी आणि पारदर्शक कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली असून, यास "महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" नाव देण्यात आलं आहे. यामध्ये 1 एप्रिल, 2015 ते 31  मार्च, 2019 पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर, 2019 रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली आणि परतफेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना अल्प/अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात 2 लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्जखात्याची मुद्दल आणि व्याजासह 30 सप्टेंबर, 2019 रोजी थकबाकीची रक्कम 2  लाखापेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्त होणार आहेत. शेतकरी बांधवांना कोणत्याही अटीशिवाय ही कर्जमाफी मिळणार असून, याकरीता शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्जखात्याशी संलग्न करुन त्याचे प्रमाणीकरण करुन घ्यावे. कर्जमाफीच्या अनुषंगाने शेतकरी बांधावासाठी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आल्याचे पालकमंत्री श्रीमती गायकवाड यावेळी म्हणाल्या.
राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तिंना केवळ 10 रुपयांमध्ये सकस आहार देण्यात येणार आहे. या ‘शिवभोजन’ योजनेची आजपासून राज्यभरात अंमलबजावणी सुरु होत आहे. पहिल्या टप्प्यात येथील जिल्हा रुग्णालय परिसरात आजपासून ‘शिवभोजन’ केंद्राची सुरुवात होत आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांच्या नातेवाईकांची सोय होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा या कोणतेही शासकीय अनुदान न घेता डिजीटल करण्यात आल्या आहे. नूकतेच राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील वीजपुरवठा आणि विजेवरील खर्चाचा प्रश्न सोडविण्यासाठी महाऊर्जा विभागाच्या माध्यमातून सौरऊर्जा उपकरणे बसवण्याचा तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पध्दतीत बदल होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व चांगाल्या आरोग्य सुविधा मिळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे, विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या शालेय बसची सुरक्षितता तपासून घेण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत आवश्यक तेवढे पाणी प्यावे आणि त्यासाठी आठवण व्हावी यासाठी तीन वेळा पाणी पिण्याची आठवण करुन देण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच मुलांवर शालेय जीवनापासूनच समता, स्वातंत्र्य, समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुता हे पंचसुत्री संविधानिक संस्कार करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधानाचे सामूहिक वाचन सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या उपक्रमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे.  शिक्षण हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हेच शिक्षकांचे काम असल्याने त्यांच्यावर अतिरिक्‍त कामांचा बोजा पडणार नाही याबाबत देखील शासन काळजी घेणार आहे. तसेच राज्यातील साडे तीन लाख शिक्षकांना सन 2016 ते 2018 या कालावधीतील 7 व्या वेतन आयोगातील फरक देणे प्रलंबीत होते. तो फरक साडे तीन लाख शिक्षकांना देण्यात आल्याचे ही पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या.
अतिवृष्टीमुळे बाधीत जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार 570 शेतकऱ्यांना मदत म्हणुन 171 कोटी 25 लाख निधी वितरीत करण्यात आला असून, उर्वरीत 69 हजार 390 शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 51 लाख एवढ्या अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत जिल्ह्याला शासनाकडून प्राप्त निधीपैकी 51 कोटी 46 लाख निधी विविध योजनावर खर्च करत जिल्हा  राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तिर्थक्षेत्र औंढा नागनाथ व नर्सी नामदेव यांच्या सर्वागिंन विकासासाठी आमचे सरकार कटीबध्द असल्याचे आहे. तसेच जिल्ह्याने सशस्त्र ध्वज दिन निधीचे 145 टक्के उद्दीष्ट साध्य केले असून, आपल्या जिल्ह्यासाठी हि अभिमानाची बाब आहे. या वर्षी ही ध्वज दिन निधीचे उद्दिष्टपूर्तीकरीता आपण सर्वांनी मदत करावी असे आवाहन ही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी केले.
हिंगोली जिल्ह्याचे दूसऱ्यांदा पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारतांना मला आनंद होत असून, आपल्या जिल्ह्याच्या चौफेर प्रगतीसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. याकरीता आपण जागरुक नागरिक म्हणुन हातभार लावावा असे ही पालकमंत्री वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली.
            प्रारंभी पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, श्वान पथक, वज्र वाहन, दहशतवाद विरोधी वाहन, अग्निशमन दल, नॅशनल कॅडेट कोर, आपत्ती व्यवस्थापन चित्ररथ, सामाजीक वनीकरणाचा हरीत चित्ररथ, आरोग्य विभागाचे आरोग्य पथक यांच्यासह विविध शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी देखील या संचलनात सहभागी झाले होते.
            कार्यक्रमांचे सुत्र संचलन प्रा. मदन मार्डीकर यांनी केले. यावेळी शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****

25 January, 2020

कर्जमुक्ती योजनेची शेतकरी बांधवांना वेळेत लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा -- पालकमंत्री वर्षा गायकवाड


कर्जमुक्ती योजनेची शेतकरी बांधवांना वेळेत लाभ देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा
                                                                                         -- पालकमंत्री वर्षा गायकवाड

        हिंगोली, दि.25: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने घोषणा केलेल्या  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळावा याकरीता प्रशासनाने प्रयत्न करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, शेतकरी बांधवांना चिंतामुक्त करण्यासाठी सहज, सोपी आणि पारदर्शक अशी "महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना" या योजनेची शासनाने घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँकेच्या कर्जखात्याशी संलग्न करुन त्याचे प्रमाणिकरण करुन घेण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
यावेळी पालकमंत्री यांनी जिल्ह्यात रब्बी हंगामात पीक निहाय व तालूका निहाय पेरणीचा आढावा घेतला. तसेच अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेले अनुदान आणि मागणी केलेल्या अनुदानाबाबत माहिती घेतली. तसेच बँकांच्या शेतीपूरक उद्योगासाठी काही योजना आहे का याबाबत विचारणा केली. जिल्ह्यात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याकरीता बँकांनी उद्योग उभारणी कर्जयोजना सुरु करता येईल का याचा अभ्यास करावा, असे ही त्या म्हणाल्या.
आपल्या जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी मोठी संधी आहे. याकरीता आपण सर्वजण मिळून चांगले काम करु अशी अपेक्षा ही पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
*****

जिल्हा वार्षिक योजनेच्या 171.70 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता


जिल्हा वार्षिक योजनेच्या 171.70 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता



हिंगोली, दि.25: जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेतंर्गत सन 2020-21 या वर्षासाठी अंमलबजावणीकरीता विभागांनी विविध योजनासांठी 356 कोटी 59 लाख 15 हजार एवढी मागणी केली असता जिल्हा नियोजन समितीने प्रत्यक्ष 171 कोटी 70 लाख 51 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देण्यात आली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीस यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, राजू नवघरे, संतोष बांगर, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यात भारनियमन चालु असताना महावितरण विभागांनी शेतकऱ्यांची अडवणुक न करता त्यांना तात्काळ रोहित्र उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच ऑईल अभावी बंद पडलेले रोहित्रांची दुरुस्ती करुन जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याबाबत महावितरण विभागांने दक्षता घ्यावी. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहीका खरेदी करण्यात यावी. ज्या शाळेत स्वच्छतागृह नसेल त्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारावी. तसेच नादुरुस्त शाळांची दुरुस्ती करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे, अशा ही सूचना पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी दिल्या.
 जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, स्वच्छ भारत अभियानासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. यावेळी तसेच सन 2019-20 आराखड्यातील विविध कामांवर झालेल्या खर्चाचा तसेच नियोजित प्रस्तावित खर्चाचा देखील आढावा घेतला. तसेच सर्वसाधारण वार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत नाविन्यपूर्ण योजना, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी झालेल्या खर्चाचा व नियोजित खर्चाचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, स्वच्छ भारत अभियान आदीबाबतही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. तसेच सर्व संबंधीत विभागांनी सन 2019-20 अंतर्गत त्यांना प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, अशा सूचना ही पालकमंत्री श्रीमती गायकवाड यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
सन 2020-21 अंतर्गत सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता 101 कोटी 68 लाख तर अनुसूचित जाती उपयोजनाकरीता 51 कोटी 90 लाख आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत 18 कोटी 12 लाख 51 हजार अशा एकुण 171 कोटी 70 लाख 51 हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजना 2019-2020 अंतर्गत डिसेंबर 2019 अखेर झालेल्या खर्चाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला. सर्वसाधारण योजने अंतर्गत 54 कोटी 56 लाख 92 हजार रुपये तर अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत 16 कोटी 19 लाख 4 हजार रुपये खर्च झाला आणि अनुसूचित जमाती आदिवासी  उपयोजनेतंर्गत (ओटीएसपी) 5 कोटी 73 लाख 87 हजार रुपये खर्च झाला आहे.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी अनुसूचित जाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला तर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विशाल राठोड यांनी ही अनुसूचित जमाती उपयोजनेचा प्रारुप आराखडा सादर केला. यावेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.
*****



युवक आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करा
--   पालकमंत्री वर्षा गायकवाड

हिंगोली,दि.25:  जिल्ह्यातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरीता बँकांनी त्यांच्यासाठी उद्योगाशी संबंधीत कर्जयोजना सुरु करुन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करावे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या .
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षा गायकवाड बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, युवाशक्ती हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे असून त्यांनी उद्योग उभा करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. परंतु त्यासाठी नौकरीबाबतची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज  उद्योगाची अनेक दालने खुली असून जिल्ह्यातील युवक आणि महिलांनी उद्योग सुरु करून विविध क्षेत्रात आपल्या जिल्ह्यात उद्योग संस्कृती निर्माण करावी. कोणताही उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. याकरीता बँकांनी उद्योग विषयक कर्ज योजना सुरु करुन जिल्ह्यातील युवक आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

*****

24 January, 2020



प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करणे आवश्यक
-          जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली,दि.24: लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून त्यासाठी मतदार यादीत नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ निमित्त्‍ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी राजु नंदकर, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्राचार्य डॉ. आर. के. सावंत, तहसिलदार श्री. खंडागळे, पोलीस निरिक्षक श्रीमनवार आणि श्री. सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
श्री. जयवंशी म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकांस निवडणुकीत मतदानाचा एक फार महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान केला आहे. यामध्ये स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाच्या मताचे समान मूल्य मानले. समानतेचे हे एक फार महत्त्वाचे सूत्र घटनेद्वारे भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळाले आहे. मतदान हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून याची जाणिव झाल्याशिवाय जगातील सर्वात मोठी असलेली आपली लोकशाही सुदृढ होणार नाही. शासनाकडून आपण ज्या अपेक्षा करत असतो, त्यांची पूर्ततेसाठी आपण मतदान करणे हे कर्तव्य ठरते. याकरीता राज्यघटनेने दिलेला हा अधिकार प्रत्येक नागरिकाने बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या एका मतामुळे काय फरक पडणार, असा विचार करुन अनेक नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत नाही. पण आपल्या एका मताने ही फरक पडू शकतो, हे लक्षात घेतले, तर मतदानाचे महत्व सर्वांना कळेल. देशात सशक्त लोकशाही हवी असेल, तर मतदानाशिवाय पर्याय नाही. मतदान हा एक मौल्यवान अधिकार आहे. याकरीता 18 ते 20 वयोगटातील युवकांनी पुढाकार घेवून आपली मतदार नोंदणी करावी. तसेच याबाबत समाजमध्ये जनजागृती ही करावी.
निवडणूकीमध्ये बीएलओ (बुथ लेवल ऑफिसर) हे अत्यंत महत्वाचा भाग असून यांच्याशिवाय निवडणुक प्रक्रिया यशस्वी पार पाडणे शक्य नाही. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी हे बीएलओच उपलब्ध करुन देतात. सद्या भारत निवडणुक आयोगाने मतदार पडताळणी कार्यक्रम बीएलोमार्फत राबविण्याची मोहिम हाती घेतली असून 13 फेब्रूवारी 2020 पर्यंत ही पडताळणी होणार आहे. आपल्या जिल्ह्यातील बीएलओंनी आतापर्यंत 69 टक्के पडताळणीचे काम पूर्ण केले असून याबाबतीत आपला जिल्हा राज्यात प्रथम असून हे फक्त बीएलओमुळे शक्य झाले आहे. याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेल्या बीएलओंचा आज सत्कार करण्यात येणार असून त्यांचे मी अभिनंदन करतो असे जिल्हाधिकारी जयवंशी यावेळी म्हणाले.
भारतीय निवडणूक आयोगाबाबत मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिणियार म्हणाले की, 25 जानेवारी, 1950 निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकीविषयक सर्व कामकाज निवडणूक आयोग करते. तीन सदस्यी निवडणूक आयोगाची रचना आहे. मतदार याद्या तयार करणे, मतदारांची पडताळणी करणे, मतदार ओळख पत्र देणे, अचारसंहिता लागू करणे, नामाकंन, नामाकंनाची छाननी, मतदान घेणे, मतमोजणी करणे, निवणुक निकाल जाहिर करणे ही महत्वाची  कार्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येतात.
तर भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगर पालिका, नगर परिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. संविधानातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन’ याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर असल्याची माहिती दिली.
तसेच 18 ते 20 वयोगटातील युवकांनी आपली मतदार नोंदणी करण्याची आवाहन करत Voter Helpline या मोबाईल ॲपद्वारे देखील मतदार नोंदणी करता येते अशी माहिती श्री. मिणियार यांनी यावेळी दिली.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर प्रास्ताविकात म्हणाले की, 25 जानेवारी 1950 रोजी आयोगाची स्थापना झाल्याने सन 2011 पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन साजरा केला जातो. नुकत्याच लोकसभा आणि विधानसभा निवडणूका शांततापूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या.  तसेच सद्या आयोगाच्या निर्देशानुसार सुरु असलेल्या मतदार पडताळणी कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात प्रथम आहे.
यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत उल्लेखनीय कार्य केलेले बीएलओ यु. एन. तोरकड, प्रताप दशरथे, एस. डी. भस्के, एस. पी. बनसोडे, एस. बी. टेहरे, एस. जी. माहोरे, वाय. सी. पारसकर, व्ही. यु. हलगे, एस. एन. नाईक, एस.टी. रामदिनेवार, एस. एस. रामोड, आर. एच. वाठोरे, जी. बी. पायघन, ए. वाय. बिल्लारी, जी. आर. क्षिरसागर आणि गजानन नायकवाल यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रामाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत कु.गायत्री वाकडे, कु. कांचन वाकडे यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच नवमतदारांना यावेळी प्रातिनीधीक स्वरुपात मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मतदानाची प्रतिज्ञा दिली.
यावेळी कार्यक्रमात शाहीर श्री. दांडेकर यांनी सादर केलेल्या मतदार जनजागृतीपर गीतांनी कार्यक्रमात बहार आणली.
कार्यक्रमास यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, बीएलओ, प्राध्यापक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश येवले यांनी केले तर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी आभार मानले.

****