हिंगोली, दि. २८ ऑक्टो (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत 1 हजार 183 ग्रंथांची निवड करण्यात आली आहे. सन २०२४ मध्ये प्रकाशित होऊन ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या या ग्रंथांची यादी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यत ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवडलेल्या ग्रंथांमध्ये 685 मराठी, 246 हिंदी आणि 252 इंग्रजी ग्रंथांचा समावेश आहे. या ग्रंथयादीतील ग्रंथांचे वितरण ग्रंथालय संचालनालयाच्या नियमानुसार २५ टक्के ग्रंथ सूट दराने करणे संबंधितांसाठी बंधनकारक आहे.
सूचना, हरकती व आक्षेप 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत
ग्रंथ यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकत अथवा आक्षेप असल्यास ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई-४०० ००१ यांच्याकडे कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात सादर करावेत. सूचना व हरकती हस्तबटवड्याने, पोस्टाने अथवा संचालनालयाने नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविता येतील.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सूचना, हरकती अथवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी यादीचे वेळेत अवलोकन करून आवश्यक असल्यास आपले म्हणणे मुदतीत सादर करावे.
ग्रंथयादीतील ग्रंथाचे नाव, लेखक, प्रकाशक किंवा किंमत यामध्ये काही बदल अथवा तफावत आढळल्यास ती संचालनालयाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी आवाहन केले आहे. ग्रंथालय संचालनालयाचे संकेतस्थळ : www.dol.maharashtra.gov.in
No comments:
Post a Comment