28 October, 2026

एक राष्ट्र, एक निवडणूक’ विषयावर हिंगोलीत विकसित भारत युथ पार्लमेंट युवकांना लोकशाही प्रक्रिया, नेतृत्वगुण व तर्कशुद्ध विचार मांडण्याची संधी


                                                   

          हिंगोली, दि. २८ ऑक्टोबर : युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य आणि तर्कशुद्ध विचार विकसित करण्याच्या उद्देशाने माय भारत, हिंगोली यांच्या वतीने विकसित भारत युथ पार्लमेंट २०२६-२७ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.

        या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण मते मांडण्याची आणि लोकशाही व्यवस्थेतील विविध पैलू समजून घेण्याची संधी मिळणार आहे. सहभागी युवकांकडून ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेच्या अनुषंगाने निवडणुकांचे नियोजन, प्रशासकीय यंत्रणेवरील परिणाम, विकासकामांमध्ये सातत्य, निवडणूक खर्च तसेच लोकशाही प्रक्रियेसमोरील संधी व आव्हाने या विविध बाबींवर विचार मांडण्यात येणार आहेत.

युवकांच्या सक्रिय सहभागातून लोकशाही बळकटीकरण

        भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक असून, लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी युवकांचा जागरूक आणि सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. विकसित भारत @ २०४७ या राष्ट्रीय संकल्पनेच्या अनुषंगाने युवकांमध्ये नेतृत्वक्षमता, संसदीय कार्यपद्धतीची समज, चिकित्सक विचार आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

        माय भारतच्या माध्यमातून आयोजित या युथ पार्लमेंटमुळे युवकांना राष्ट्रीय विषयांचा अभ्यास करून त्यावर आपली मते प्रभावीपणे मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच युवकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करून त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.



No comments: