17 December, 2021

 कोव्हिड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकांना

सानुग्रह सहाय्य प्रदान करण्यास मदत करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत

·         प्राप्त अर्जांची माहिती 18 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराष्ट्र राज्यातील जी व्यक्ती कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह  सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून  प्रदान करण्यास शासनाने  मानयता दिलेली आहे व राज्य शासनाने सदर अनुदान वाटपाबाबतची कार्यपध्दती  विशद केलेली आहे.

राज्य शासनाने कोव्हिड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकाने सानुग्रह सहाय्य प्रदान करण्यासाठी विकसित केलेल्या mahacovid19relief.in  या वेब पोर्टलवर  ऑनलाईन  केलेला अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण  यास सानुग्रह अनुदान वितरीत  करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर  अंतिम मंजुरी  देईल, असे निर्देश दिलेले आहेत.

हिंगोली जिल्ह्यामये  आयसीएमआर पोर्टलवर कोव्हिड-19 या आजाराने  507 व्यक्ती निधन पावल्याची नोंद आहे. परंतु प्राप्त निर्देशानुसार  पोर्टलवर  हिंगोली जिल्ह्यातून  आज अखेर  सर्व अर्ज प्राप्त झालेले नाहीत.

जिल्ह्यातील  कोव्हिड-19 या आजाराने  निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य प्राप्त  होण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे व त्यांना आवश्यक  ती मदत  करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीचे सदस्य म्हणून नगर परिषद/पंचायतचे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांची  नियुक्ती केली आहे.

या समितीचे अध्यक्ष तहसीलदार यांनी आपल्या तालुक्यातील  मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी व त्यांचे अधिनस्त अधिकारी यांची दि. 16 व 17 डिसेंबर, 2021 रोजी तात्काळ बैठक घ्यावी. तसेच शहर स्तरावर  मुख्याधिकारी व ग्राम स्तरावर  गट विकास अधिकारी यांना आयसीएमआर  यादी द्यावी. या यादीनुसार  मुख्याधिकारी  व गट विकास अधिकारी यांनी त्यांचे  अधिनस्त  अधिकारी, कर्मचारी यांचे पथक नेमावे, तसेच पथकास यादीनुसार वार्ड , गावांची विभागणी करावी. पथकाने आयसीएमआर  पोर्टलवर  कोव्हिड-19 या आजाराने  मयत झालेल्या व्यक्तींच्या यादीनुसार सदर वार्डातील, गावातील मयत व्यक्तींचे  निकट नातेवाईकांशी संपर्क साधावा. संपर्क साधून मयत पावलेल्या व्यक्तीच्या निकट  नातेवाईकांनी mahacovid19relief.in  या पोर्टलवर सानुग्रह सहाय्य प्राप्त होणे कामी  अर्ज भरला आहे किंवा कसे याची खातरजमा  करावी. अर्ज भरला असल्यास अर्जाचा आयडी आणि निकट नातेवाईकांचे  ना हरकत  असल्याचे स्वयंघोषणापत्र तहसील कार्यालयास सादर करावे.  अर्ज भरला  नसल्यास खालील कागदपत्रे, माहितीसह सेतू केंद्रात  किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV  मधून  ऑनलाईन अर्ज अचूक भरुन घेण्यास सांगावा अथवा भरुन देण्यास मदत करावी. (सेतू केंद्रात ऑनलाईन अर्ज  भरत असताना  जास्तीची आकारणी होत नाही याची खातरजमा करावी.)

अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी  क्रमांक, अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील (आधार लिंक असलेला), मृत पावलेल्या व्यक्तीचा सर्व तपशील (आधार) , मृत  पावलेल्या व्यक्तीचे  जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र, अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेल्या धनादेशाची  प्रत, मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, अनुक्रमांक 6 उपलब्ध  नसेल तर आरटीपीसीआर रिपोर्ट प्रत किंवा सीटीस्कॅन प्रत किंवा इतर वैद्यकीय  प्रमाणपत्र (कोरोनाने मयत झाल्याचे प्रमाणपत्र), इतर निकट नातेवाईकांचे ना हरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र सादर करावे.

अर्जदाराने अर्ज भरताना निकट नातेवाईकांचे ना हरकत स्वयंघोषणा पत्र घेतले आहे किंवा कसे याबाबत पथकातील कर्मचाऱ्याने खातरजमा करावी. सदर ना हरकत प्रमाणपत्राची छायाप्रत तहसील कार्यालयास सादर करावी. तहसील कार्यालयाने पथकामार्फत  पुढीलप्रमाणे सर्व माहिती  जिल्हाधिकारी  कार्यालयास सादर करावी. अर्जदाराने  भरलेल्या अर्जाचा अर्ज क्रमांक, अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच मयत व्यक्तीचे नाव व मृत्यूचा दिनांक इत्यादी बाबतची माहिती इंग्रजी (एक्सेल फॉरमॅट) मध्ये  दि.18 डिसेंबर, 2021 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपावेतो जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.

पथकाने  कोव्हिड 19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्य  प्रदान करणेबाबत शासनाने विकसित केलेल्या  mahacovid19relief.in    या पोर्टलवर  आवश्यक कागदपत्रांसह  ऑनलाईन अर्ज करण्यास तालुका, गाव पातळीवर आवश्यक ती प्रसिध्दी द्यावी.

सद्य:स्थितीत निवडणुका चालू असल्याने समिती आणि पथकाने वरीलप्रमाणे कार्यवाही करताना केवळ शासकीय यंत्रणेचा वापर करावा. वरीलप्रमाणे समितीने आवश्यक साधनसामग्री व अधिनस्त कर्मचारी यांचा यथायोग्य वापर करुन नेमून दिलेली जबाबदारी तात्काळ पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

*******

No comments: