06 December, 2021



 

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना व आझादी का अमृत महोत्सवानिमित्त

आदर्श महाविद्यालयात बालकांचे हक्क, योजना, कायद्याविषयी जनजागृती

 

हिंगोली, (जिमाका) दि. 06 : महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ SBC 3 यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार 'आझादी का अमृत महोत्सव', 'आंतरराष्ट्रीय दत्तक महिना', सक्षम युवा शक्ती कार्यक्रमानिमित्त दिनांक 4 डिसेंबर, 2021 रोजी आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बाल विवाह निर्मुलन बाबतचे मार्गदर्शन आणि बाल हक्क सप्ताहाबाबतची माहिती देत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी युनिसेफ SBC3 चे समन्वयक पुजा यादव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडित व समुपदेशक सचिन पठाडे यांनी बालकांचे हक्क व योजना, बालकांच्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. कोणतेही बालक परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन व www.cara.nic.in या संकेत स्थळावर नोंदणी करुन इच्छुक पालक बालकाला दत्तक घेऊ शकतो. तसेच जर बाल विवाह संदर्भात कुणालाही माहिती मिळाली असता त्यांनी चाईल्ड लाईन (1098) या टोल फ्रि क्रमांकावर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क करावा, अशी  माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर. लाठी, उप प्राचार्य डॉ. विलास आघाव, एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.एम.नगरकर, डॉ.एस.पी.हटकर, एस.ए.वऱ्हाड, बी.टी.राठोड तसेच हिंगोली चाईल्ड लाईनची टीम उपस्थित होती .

*****

No comments: