27 December, 2021

 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी

पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 27 :  शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास , भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी , 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात , शिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे.

या योजनेअंतर्गत सन 2020-21 व 2021-22 साठी 31 डिसेंबर, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण, हिंगोली  यांनी केले आहे.

योजनेचे निकष : विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्यांने स्वत:चा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल्ड  बँक खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त  नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. (ज्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला आहे तो विद्यार्थी, ते महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ज्या महानगर पालिका, ग्रामपंचायत यांच्या हद्दीत आहे, त्या महानगरपालिका, ग्रामपंचायत येथील रहिवाशी नसावा). नगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालय, शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. विद्यार्थी 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. 12 वी मध्ये विद्यार्थ्यांस किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी, पदव्यूत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. या योजनेचा पुढे लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यास अभ्यासक्रमाचे मागील प्रत्येक शैक्षणिक वर्षात किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन , सीजीपीए असणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षापेक्षा कमी नसावा. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी  खास बाब सवलत लागू राहणार नाही.

विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्डची सत्यप्रत, बँक पासबूक सत्यप्रत, उत्पन्नाचे प्रमाणपत्र अडीच लाखाच्या आत, फॉर्म नंबर 16, विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, इयत्ता 10 वी, 11 वी, 12 वी व पदवी परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट सर्टीफिकेट, विद्यार्थींनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्नाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थी सध्या जेथे राहतो त्याबाबतचा पुरावा (खाजगी वसतिगृह, भाडे करारनामा इ. ) , महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परिक्षेच्या निकालाची प्रत, अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गरजू विद्यार्थ्यांनी तो संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ज्या जिह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावा. विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान 75 टक्के आवश्यक राहील. याबाबत संबंधित संस्थेचे उपस्थिती प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील. तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली केली जाईल, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.    

*****

No comments: