16 December, 2021

 




येत्या आठ दिवसात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करावा

-- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

* दररोज 3 हजार कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश.

 

हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात येत्या आठ दिवसात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज दिले.

येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बरगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.  

           यावेळी बोलताना श्री. केंद्रेकर म्हणाले, ओमायक्रॉनच्या विषाणूच्या प्रसाराची तीव्रता जास्त असल्याने संभाव्य लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. सकाळी किंवा सायंकाळी लसीकरणासाठी योग्य वेळ असून यासाठी येत्या आठ दिवसात लसीकरणाचा पहिला डोस शंभर टक्के पूर्ण करावा. तसेच कोरोनाच्या चाचण्या अत्यंत कमी असून त्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला दररोज 200 कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश द्यावेत व जिल्ह्यात दररोज किमान 3 हजार कोरोना चाचण्या होतील असे पहावे. लस न घेणाऱ्या नागरिकांसाठी कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ देऊ नये. तसेच लसीकरण केलेल्यानाच शासकीय कार्यालयात प्रवेश द्यावा. खाजगी आस्थापना, दुकाने, फळवाले, रिक्षावाले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे येणाऱ्या नागरिकांकडे लसीकरण प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देऊ नये व येथे येणाऱ्या नागरिकांचे व कामगारांचे दर दहा दिवसांनी कोरोना चाचणी करावी. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाहीत त्यांचे लसीकरण करावे. लसीकरणास नकार देणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देऊ नयेत. तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांमार्फत दंडाची कार्यवाही करावी. पोलिसांच्या सहायाने जिल्ह्यांच्या सीमा सील कराव्यात व येथे येणाऱ्या नागरिकांची कोरोना लसीकरण व कोरोना चाचणी कराव्यात. कोरोनाच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी पुरेसा औषधाचा साठा, ऑक्सिजन टँक, रेमडेसिवरची उपलब्धता करुन ठेवावी. व्हेंटीलेटरची तपासणी करुन सुस्थितीत ठेवावेत. तसेच रुग्णालयात तीन प्रकारच्या वार्डाची सोय करावी. तसेच सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाहणी करुन खात्री करावी. तसेच जिल्ह्यातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिरात येणाऱ्या भक्तांना व तेथील पुजाऱ्यांना मास्क लावणे बंधनकारक करावे, अशा सूचना दिल्या.

            महसूल विभागाचा आढावा घेताना श्री. केंद्रेकर म्हणाले, शासकीय जमिनीची नोंद असलेले अद्ययावत नोंदवही ठेवावे. ही नोंदवही दर सहा महिन्यांनी अद्यावत करावी. तसेच शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण कोणाच्याही दबावाला बळी न पडता कायद्याचा वापर करुन काढण्याचे काम करावेत. गुगल ॲपच्या माध्यमातून जमीन मोजता येते. या ॲपची माहिती घेऊन शासकीय जमिनीवर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनीची माहिती घेऊन त्याचा तपशील अद्ययावत ठेवावा. तसेच गाव नमुनाही अद्ययावत करावा. न्यायिक प्रकरणे, अर्धन्यायिक प्रकरणे, वाळू लिलाव, प्रलंबित फेरफारची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

            तसेच त्यांनी निवडणूक, जलजीवन मिशन, वृक्ष लागवड, पाणवठे, मातोश्री पाणंद रस्ते योजना, घरकुल योजनेचा आढावा घेतला. रोजगार हमी योजनेतील विहिरीचे कामे तातडीने पूर्ण कराव्यात. तसेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या जास्तीत जास्त योजना राबवाव्यात व जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण करावीत. घरकुल योजनेचे सर्व प्रकरणे तात्काळ मंजूर करावेत. माझे गाव सुंदर गाव, माझे कार्यालय सुंदर कार्यालय तसे सर्व शाळेत ग्रंथालय, अभ्यासिका व सोलरची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या.

            यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘‘थोडेसे मायबापासाठी’’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते बॅटरी, काठी व उबदार ब्लँकेटचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.

            या बैठकीस जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.     

*******

No comments: