01 December, 2021

 

सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी

कोरोना लसीकरण प्रमाणपत्र व मास्क आवश्यक

 

  • लसीकरण प्रमाणपत्राशिवाय उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सेवेचा लाभ नाही

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 01 :  जगात सध्या कोरोनाचा नवीन धोकादायक व्हेरिएंट ओमायक्रॉनचे संकट असून त्याच्या वाढत्या प्रभावास तोंड देण्यासाठी 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. याअंतर्गत सार्वजनिक, खाजगी वाहनातून प्रवास करण्यासाठी 18 वर्षावरील सर्व वाहनचालक, मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोविड लसीकरण करुन घ्यावे व प्रवासादरम्यान मास्क घालावे .

            जिल्ह्यातील सर्व ॲटोरिक्षा, टॅक्सी, बस, जीप इत्यादी खाजगी व सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनचालक, वाहनमालक व प्रवासी यांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवासाची वाहतूक करता येणार नाही.

            वाहनचालक, वाहनमालक व प्रवासी विना लसीकरण व विना मास्क आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यासाठी सर्व ट्रॅव्हल्सचालक, प्रवासी वाहन मालक यांनी लसीकरण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांनाच  वाहनामध्ये प्रवेश द्यावा अन्यथा त्यांना वाहनामध्ये प्रवेश देऊ नये. आपल्या वाहनामध्ये विना मास्क, विना लसीकरण आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

            येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, अनुज्ञप्ती नुतनीकरण, परवाना नुतनीकरण, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, खटला विभागातील कामकाज आदी कामाच्या निमित्ताने येणाऱ्या अर्जदाराकडे कोरोना लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली  कार्यालयाच्या सेवेचा लाभ घेता येणार नाही, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

No comments: