17 December, 2021

 

मातोश्री ग्राम समृध्दी शेत, पाणंद रस्ते योजनेसाठी

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत

 

              हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टिकोनातून शासन स्तरावरुन ‘मी समृध्द तर गाव समृध्द’ आणि ‘गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द’ ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्यासाठी उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्यासाठी बारमाही वापरासाठी शेत, पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी शासनाने दि. 11 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये मातोश्री ग्राम समृध्दी शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता दिली आहे.

             त्याअनुषंगाने या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हिंगोली  जिल्ह्यातील गावामधील अशा सर्व रस्त्यांचे जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            दि. 21 डिसेंबर, 2021 पूर्वी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या शेत पाणंद रस्त्याचा आराखडा (यादी) ग्रामपंचायतीच्या मासिक ठराव, विशेष सभा अथवा ग्रामसभा यापैकी जे शक्य असेल त्यानुसार तात्काळ तयार करावेत आणि दि. 23 डिसेंबर, 2021 पर्यंत तयार करण्यात आलेली प्रत्येक ग्रामपंचायतीची शेत पाणंद रस्त्याची यादी गट विकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर एकत्रित करावे व विहीत नमुन्यात जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात यावे.

             वरीलप्रमाणे कार्यवाही करताना ग्रामपंचायतीने ठरावासाठी पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही  व जास्तीत जास्त पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव पाठवितांना प्राधान्यक्रम निश्चित करुन सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय मातोश्री पाणंद रस्ते समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.    

*****

No comments: