31 December, 2021

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याकरिता नवीन आदेश जारी

 

  ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे. त्या अनुषंगाने लग्नसराई, इतर सणवार व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितीत नवीन ओदश लागू करण्यात आले आहेत.

लग्न समारंभ मोकळ्या मैदानावर, बंदिस्त सभागृहात अथवा कोठेही आयोजित करण्यासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असेल, कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम जसे कि सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रम मोकळ्या मैदानावर, बंदिस्त सभागृहात अथवा कोठेही आयोजित करण्यासाठी केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी असेल,अंतिम विधी, अंत्य यात्रेसाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी असेल, ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश दि.३१ डिसेंबर,२०२१ रोजी रात्री १२.०० पासून हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे. तसेच या व्यतिरिक्त असणाऱ्या बाबी, सूचना कोरोना निर्बंध, मार्गदर्शक सूचना  पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन संबंधीतांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची असेल, असे जिल्हा आपत्ती प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000

 

No comments: