09 December, 2021

 


औद्योगिक क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करुन तातडीने उपाययोजना कराव्यात

-- जिल्हाधिकारी जितेंद पापळकर

 

हिंगोली (जिमाका), दि. 09 :  जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये पाणी, वीज, औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. कादरी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उद्योग निरीक्षक एम.डी. सुर्यवंशी, जी.एम. पवार, अग्रणी बँकेचे अधिकारी श्री. सावंत, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनीचे अभियंता यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच उद्योजक या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत शहरातील औद्योगिक क्षेत्र वाढविण्यासाठी लागणारा भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करणे, सेनगाव व औंढा तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाबाबत कार्यवाही करणे, हिंगोली औद्योगिक क्षेत्रातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजना तयार करुन त्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत सूचना दिल्या. कळमनुरी येथे हळदी क्लस्टर उभारण्यासाठी उत्सूक उद्योजकांचे प्रस्ताव घेऊन कार्यवाही करणे, औद्योगिक क्षेत्रासमोरील औंढा रोडवरील अतिक्रमण काढण्याबाबत व उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या. तसेच हिंगोली औद्योगिक क्षेत्राचा वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसवावा अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. त्याअनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्याही सूचना दिल्या.

तसेच यावेळी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचाही आढावा घेण्यात आला.     

*****

No comments: