25 December, 2021

 

बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात अधिकचे निर्बंध लागू

  • रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत एकत्र येण्यास मज्जाव
  • सर्व प्रकारच्या समारंभात उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध

 

हिंगोली (जिमाका), दि. 25 :  कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार जगभर अत्यंत वेगाने होत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 88 असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवड्यात वाढल्याचे दिसून येत आहे. नाताळ, लग्नसराई, इतर सणवार व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे.

त्यामुळे बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितीतील निर्बंधापेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने  जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.

1. शासनाने नाताळ सण साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असून त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचनांचे पालन करण्यात यावे.

2. विवाह समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 100 च्या मर्यादेत असेल. असे समारंभ मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

3. अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी जास्तीत जास्त 100 उपस्थितांची मर्यादा पाळावी. असे समारंभ मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे.

4. वर नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसन व्यवस्था फिक्स असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमतेच्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था फिक्स नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करीत असताना व आसन व्यवस्था त्या जागेच्या 25 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. असे कार्यक्रम मोकळ्या जागेमध्ये आयोजित करताना त्या जागेच्या 25 टक्के पेक्षा अधिक उपस्थिती राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

5. क्रीडा स्पर्धा व सामन्याचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या जास्तीत जास्त 25 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी.

6. रेस्टॉरंट, जिम, स्पा, सिनेमा व नाट्यगृहे तेथील आसनक्षमतेच्या 50 टक्के मर्यादेच्या अधीन राहून सुरु ठेवण्यास मुभा राहील. परंतु तेथे एकूण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली 50 टक्के क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा.

7. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव राहील.

8. तसेच यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार निर्गमित केलेले कोरोना निर्बंध, मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. 

त्यानुसार वरीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत असून सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येऊन संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 यानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली, पोलीस अधीक्षक हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी न.प.न.पं. तसेच सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची असेल.

*****

No comments: