01 June, 2023

 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी 10 जून पर्यंत मोहिम

लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

* गावातील पोस्टातही करता येणार ई-केवायसी

 

                 हिंगोली (जिमाका), दि. 01 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 14 व्या हप्त्याच्या वितरण नियोजनासाठी राज्यात गावपातळीवर सर्वत्र मोहिम राबवून ई-केवायसी साठी सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

                केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नर मध्ये ओटीपी आधार तसेच सामाईक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान ॲप अँड्राईड मोबाईलवर फेस ॲथेंटीकेशनद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थींना स्वत:चे ई-केवायसी प्रमाणिकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे सुध्दा ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. हा ॲप वापरण्याची कार्यपध्दती व केंद्र शासनाकडून प्राप्त वापरकर्ता पुस्तिका सोबत सहपत्रित करण्यात येत आहे. तसेच कृषि विभाग व केंद्र शासन यांनी याबाबत उपयुक्त व्हिडीओ क्लिप दिलेली आहे. ती देखील आपल्या क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत गावपातळीवरील सर्व व्हॉटस्अप ग्रुपवर पाठवून हा अॅप वापरण्याबाबत जागरुकता निर्माण करावी. यासाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्याने दि. 01 जून ते दि. 10 जून, 2023 या कालावधीत गावनिहाय कॅम्प सुरु ठेवावेत. या ॲपच्या माध्यमातून तात्काळ प्रलंबित असलेल्या लाभार्थींची ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. ई-केवायसी प्रमाणिकरणाअभावी कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी.

                प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी लाभार्थीची माहिती भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत करणे, योजनेतील पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे, पात्र लाभार्थी बँक खाते आधार संलग्न करणे बंधनकारक केले आहे.

त्यामुळे वरील प्रलंबित बाबींची पूर्तता करण्यासाठी दि. 01 जून ते दि. 10 जून, 2023 या कालावधीत मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये गावपातळीवर कॅम्प आयोजन करुन ई-केवायसी करण्यासाठी सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) व बॅक खाती आधार संलग्न करण्यासाठी आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) यांच्या समन्वयाने कार्यवाही करावी. आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट बँक) च्या अनुषंगाने मुख्य पोस्ट मास्तर, हिंगोली यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार गावनिहाय पोस्टमन यांच्याकडे खाते उघडण्यासाठी ॲन्ड्राईड मोबाईल सुविधा असून गावातच खाते उघडून देण्याबाबत त्यांच्या स्तरावरुन कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी तलाठी, कृषि सहायक यांनी गावात लाभार्थ्यांशी संपर्क करुन याबाबत अवगत करावे. गावपातळीवर कॅम्प आयोजनासाठी प्रलंबित ई-केवायसी तसेच बँक खाती आधार संलग्न न झालेल्या लाभार्थींच्या गावनिहाय याद्या उपलब्ध करुन द्याव्यात. यादीतील सर्व लाभार्थींशी वैयक्तीक संपर्क होईल अशी कार्यवाही करावी. लाभार्थींची भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे माहिती प्राधान्याने पोर्टलवर अद्ययावत करावी. लाभार्थ्यांच्या राज्यातील भूमी अभिलेख नोंदीमध्ये माहिती उपलब्ध नसल्यास खातरजमा करुन त्यास पोर्टलवर अपात्र मार्क करावे. वारंवार संपर्क करुनही लाभार्थी ई-केवायसी करत नसल्यास तशी दप्तरी नोंद घेऊन अशा लाभार्थीस अपात्र मार्क करावे. या मोहिमेच्या यशस्वीरित्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावरुन रोजच्या रोज सनियंत्रण करावे.

वरीलप्रमाणे बंधनकारक बाबींच्या पूर्ततेअभावी आपल्या तालुक्यातील कोणाताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

जिल्ह्यात ई-केवायी मोहिम दि. 1 जून ते 10 जून, 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

*****

No comments: