14 June, 2023

 

महाज्योतीच्या एमएचटी आणि सीईटी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !

101 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यावर परसेंटाईल स्कोअर

 



हिंगोली (जिमाका), दि.14 : महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा. म्हणजेच एमएचटी-सीईटी. विद्याथ्यांसाठी  इयत्ता बारावी नंतर अनेक शाखांसाठी मार्ग खुले होतात आणि या सर्व शाखांमधे प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक अशी संयुक्त परीक्षा घेतली जाते ती म्हणजे एमएचटी-सीईटी. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रम इत्यादी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकताच घोषीत केला आहे.

त्यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी प्रशिक्षण योजनेतील 101 विद्यार्थी 90 टक्क्यावर परसेंटाईल स्कोअर घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. तर इतर विद्यार्थी 80 ते 85 परसेंटाईल स्कोर घेऊन मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झालेली आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय महाज्योतीला दिलेले आहे.

एमबीए, एमसीए, बी.आर्च, कृषी यासह अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी प्रशिक्षण महाज्योती मार्फत मोफत देण्यात येते. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब तसेच इंटरनेट डाटा पुरविला जातो. अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकाचा संच घरपोच दिल्या जातो. तज्ञ प्रशिक्षकांव्दारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाते. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

मा.ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

1) मृणाल नरेंद्र तारगे

महाज्योतीच्या एमएचटी आणि सीईटी परीक्षा प्रशिक्षण या योजनेची माहिती मित्राकडून मिळाली होती. मी दहावी नंतरच ऑनलाईन प्रोसेसनी नोंदणी प्रक्रीयेत सहभाग घेतला. निवड झाल्याचे कळवण्यात आले. प्रशिक्षणासाठी महाज्योती कडून मोफत टॅब, इंटरनेट डाटा देण्यात आला. ऑनलाईन प्रशिक्षण सुरु झाले. शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. त्यामुळे मला 99.89 इतके पर्सेंटाईल स्कोअर मिळून शकले. ज्या विद्यार्थ्यांकडे सोर्स नाही अश्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मार्गदर्शकाचे काम करीत आहे.

2) श्वेता शामराव सूर्यवंशी

मला महाज्योतीच्या एमएचटी आणि सीईटी परीक्षा प्रशिक्षणा अंतर्गत मोफत टॅब आणि इंटरनेट डाटा पुरवण्यात आला. अतिशय गुणी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयाची विस्ताराने मांडणी केली. सगळे डाउट क्लिअर केले. सर्व विषयाची उत्तम तयारी करुन घेतली. कोर्स पलिकडे जाऊन अधिक माहिती दिली. अगदी परीक्षेपर्यंत क्लासेस घेतले. त्यामुळे खुप तयारी झाली. चांगला स्केर मिळवता आला. बेसिक पाया पक्का झाला. माझ्या पुढच्या करीअरमधे महाज्योतीचे स्थान महत्त्वाचे राहील.

*****

No comments: