20 June, 2023

 

चला जाणूया नदीला अभियानाचा तांत्रिक आराखडा तयार करण्यासाठी

तात्काळ माहिती उपलब्ध करुन द्यावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 



 

        हिंगोली (जिमाका), दि. 20 :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने चला जाणूया नदीला हे अभियान राबवित आहे. जला जाणूया नदीला अभियानाचा तांत्रिक आराखडा अंतिम करण्यासाठी  सर्व संबंधित विभागाने लागणारी माहिती तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  दिले.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज चला जाणूया नदीला या अभियानाचा तांत्रिक आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी  सहायक वनसंरक्षक अधिकारी सुनिल शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रमेश मांजरमकर, चला जाणूया नदीला राज्य समितीचे सदस्य जयाजी पाईकराव, आसना नदीचे समन्वयक तानाजी भोसले, बालाजी नरवाडे उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, चांगल्या पध्दतीचा आराखडा तयार करण्यासाठी तालुकास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठका घेऊन कयाधू व आसना नदी खोऱ्यातील गावनिहाय आराखडा तयार करावा आणि तो जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावा. यासाठी संबंधित विभागानी आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना कृषी, जलसंधारण, भूजल सर्वेक्षण यासह विविध विभागांना केल्या.  

            यावेळी उगम संस्थेचे सुशांत पाईकराव यांनी चला जाणूया नदीला या अभियानासाठी तांत्रिक आराखडा तयार करण्यासाठी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

            यावेळी वनप्रेमी ए.एस. नाथन यांनी स्वस्तिक पध्दतीच्या झाडाची लागवड केल्यास उर्वरित जागा उपयोगात येते. यासाठी अनेक राज्यात ही पध्दत राबविली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातही ही स्वस्तिक पध्दतीने झाडे लावण्यास उर्वरित जागा वापरण्यासाठी उपयोगात आणता येते, अशी माहिती दिली.

****

No comments: