15 June, 2023

 

शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके यांची एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी करु नये

एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा

 

 

            हिंगोली (जिमाका), दि. 15 : सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झालेला आहे. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे इत्यादीची खरेदी सुरु आहे. जिल्ह्यात बियाणे, खते यांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. विशेषत: कापूस पिकाबाबतीत शेतकऱ्यांचा कल बीटीजीन असलेल्या वाणाची पेरणी करण्याकडे आहे. बीटीजीन असणाऱ्या विविध कंपन्यांची बियाणे बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्या सर्वांमध्ये बीटीजीन असल्याने त्याची बोंड अळीला प्रतिकार करण्याची क्षमता असल्यामुळे कापूस बियाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह करु नये. शासनाने तुलसी कंपनीचे बीटी कापूस वाण, कबडडी, पंगा, राशी कंपनीचे राशी 659 तसेच इतर सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या बीजी-2 कापूस बियाण्याच्या पाकिटाची कमाल किरकोळ विक्री किंमत 853 रुपये इतर ठरवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. तसेच जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रांनी कोणत्याही कृषि निविष्ठांची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करु नये अन्यथा संबंधित कृषि सेवा केंद्राचा विक्री परवाना निलंबित अथवा रद्द करण्यात येईल. बियाणे, खते व किटकनाशके इत्यादींची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी तात्काळ कृषि विभाग पंचायत समिती औंढा नागनाथ (मो. 8087889299), कृषि विभाग पंचायत समिती वसमत (मो. 9028905357), कृषि विभाग पंचायत समिती कळमनुरी (मो. 7038473903), कृषि विभाग पंचायत समिती सेनगाव (मो. 9158121718), कृषि विभाग पंचायत समिती हिंगोली (मो. 9405323058) या कृषि विभागाच्या तक्रार नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे यांनी केले आहे.

******

No comments: