23 June, 2023

 

सामाजिक न्याय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 23 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत दिनांक 26 जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिन असल्याने प्रतिवर्षी  सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

            प्रतिवर्षो प्रमाणे दिनांक 26 जून, 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.     त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय दिना निमित्त हिंगोली येथे समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले  आहे. या समता दिंडीचे उद्घाटन हिंगोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे सकाळी 8.30 वाजता लोकप्रतिनिधी (मा.आमदार व मा.खासदार), जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर मान्यवरांच्या हस्ते समता दिंडीस हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.  

ही समता दिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे महात्मा गांधी पुतळा-संविधान कॉर्नर-इंदिरा गांधी पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली येथे समता दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे.

            तद्नंतर राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अंतर्गत सुरु असलेल्या मागासवर्गीय मुलां / मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती निमित्त तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार, पालक, विद्यार्थी व महाविद्यालयाचे प्राचार्य, सामाजिक कार्येकर्ते, विविध लोकप्रतिनिधी व विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुखांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

 

*****

No comments: