24 June, 2023

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी

सामाजिक न्याय दिन

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात ते सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते. समाजातील दुर्लक्षित मागासवर्गीय दुर्बल घटकांच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन विशेष सहानुभूती व सुधारणावादी होता. मागासवर्गीय अपंग, वृध्द, निराधार, दुर्बल इत्यादी घटकांच्या कल्याणार्थ त्यांनी अनेक निर्णय अंमलात आणले. त्यांचा आदर्श समाजापुढे विशेषत्वाने यावा या दृष्टिकोनातून त्यांचा जन्मदिवस दि. 26 जून हा प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे नाव संपूर्ण देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यांना लोकराजा’ (लोकांचा राजा) आणि आरक्षण व्यवस्थेचे जनक म्हणून ओळखले जाते. कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल केली होती. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला आणि 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूरच्या राजघराण्याने त्यांना दत्तक घेतले. त्यांनी कोल्हापूर संस्थानाची  सूत्रे  हाती  घेतली. त्यांनी 28 वर्षे राज्य केले, मात्र त्यांनी कोल्हापुरात लोकराज्य आणले. एक राजेशाही असामान्य, छत्रपतींनी समानतेची बीजे पेरली. बहुजन समाजाच्या आणि अस्पृश्यांसाठी सर्वांगीण विकासासाठी अविरत कार्य केले, सामान्य लोकांबद्दल सहानुभूती बाळगली, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले, आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह आणि  महाराष्ट्रात  हरितक्रांतीची  शुभ  सुरुवात  केली.  एक अपवादात्मक राजा, शाहू महाराज हे सामाजिक सुधारणांचे सक्रिय समर्थक होते.

राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. 1894 मधील त्याच्या राज्याभिषेकापासून  ते 1922 मध्ये त्याच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्वाचे प्राधान्य होते.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी या काळात शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करुन दिली. तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासाठी महत्वाची भूमिका बजावली. महाराजांना राजर्षी ही पदवी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांना त्यांच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात.

               शाहू महाराजांनी केलेले सामाजिक कार्य सर्वात लक्षणीय आहे. त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. सामाजिक प्रगती मर्यादित करणाऱ्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात विविध सुधारणा सुरु केल्या, ज्यांनी त्यांच्या राज्यात आधुनिक युगाची सुरुवात केली. समाजाचे हित व कल्याण लक्षात घेऊन त्यांनी कायदे व सुधारणा केल्या. मागासवर्गीयांच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी या राजाने केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. समाजातील विषमता दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जातिवादाचे समर्थन करणाऱ्या व्यवस्थेला मोठा धक्का दिला. मागासवर्गीयांना मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांनी नवीन शाळा उघडल्या आणि समाजातील विविध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, अमरावती आणि पंढरपूर येथे वसतिगृहे बांधली. छत्रपतींनी समाजातील या कलंकित घटकासाठी माणगाव येथे अधिवेशन आयोजित केले आणि डॉ.आंबेडकरांच्या कार्याला सक्रियपणे प्रोत्साहन दिले. त्यांनी मागासवर्गीयांसाठी पदे राखून ठेवली आणि आंतरजातीय विवाह कायदा, बलुते पद्धत आणि महार जमिनी रद्द केल्या. रुग्णालये, शाळा आदी सार्वजनिक ठिकाणी सामाजिक समता पाळली पाहिजे, असे आदेशही त्यांनी दिले.

राजर्षी छत्रपती  शाहू महाराजांचा सामाजिक न्याय प्रस्थापनेचा दृष्टिकोन लक्षात घेऊन दि. 26 जून हा त्यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. हा सामाजिक न्याय दिन अधिक लोकाभिमुख व्हावा या दृष्टीने व जनतेमध्ये सामाजिक न्यायाच्या प्रती अधिक जागरुकता निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.

प्रतिवर्षो प्रमाणे याही वर्षी दिनांक 26 जून, 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.    त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली येथे समता दिंडीचे आयोजन करण्यात आलेले  आहे. ही समता दिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे महात्मा गांधी पुतळा-संविधान कॉर्नर-इंदिरा गांधी पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे निघून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, दर्गा रोड, हिंगोली येथे समता दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे.

            यानंतर राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जन्म दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अंतर्गत सुरु असलेल्या मागासवर्गीय मुलां / मुलींचे शासकीय वसतिगृहातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे , जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके यांच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावरही सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत आहे.

 

 

                                                                                                - चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक

                                                                                                   जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

***** 

No comments: