22 October, 2026

उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वाहनांना रवाना

            हिंगोली, दि. २२ ऑक्टोबर (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने मतदान पथकांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मतदान पथकांची वाहने संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आली.

            यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रगती चौंडेकर, तलाठी अनिल काळे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतपेट्या, मतदान साहित्यासह पथके केंद्रांकडे रवाना ०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : आठही जिल्ह्यांत मतदान साहित्याचे वितरण पूर्ण

                                                            

उद्या ८४२ केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान

        छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : ०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांत आज मतदान साहित्याचे वितरण पूर्ण करण्यात आले. मतपेट्या व आवश्यक मतदान साहित्यासह नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली. उद्या शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत विभागातील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

        विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड व हिंगोली या आठही जिल्ह्यांत निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली आज तालुकानिहाय वितरण केंद्रांवरून मतदान पथकांना साहित्याचे वाटप करून नेमून दिलेल्या मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले.

        छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मतदान केंद्रांसाठी नियुक्त पथकांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथून मतदान साहित्याचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही संबंधित मतदान केंद्रांसाठी नियुक्त पथकांना साहित्य देण्यात आले.

आठ जिल्ह्यांत ८४२ मतदान केंद्रे

        मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २१७, जालना ८९, परभणी ७६, हिंगोली ३६, नांदेड १२०, लातूर ८८, धाराशिव ७६ व बीड जिल्ह्यात १४० अशी एकूण ८४२ मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी ४१ उमेदवार रिंगणात असून, एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदारांनी मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करावयाचे आहे.

        मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा. संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत असे करा मतदान...! शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान !

 विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत असे करा मतदान...!

शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मतदान !

छत्रपती संभाजीनगर, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी येत्या शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतदान पद्धती आणि आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अन्य सार्वत्रिक निवडणुकातील मतदानाची पद्धती यात मूलभूत फरक आहे. विधानपरिषद निवडणूकीचे मतदान हे मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून घेण्यात येते. जितके उमेदवार निवडणूक लढवित असतील अशा सर्वांपुढे पसंतीक्रम नोंदविता येतो. मतदानाच्या या वेगळ्या पद्धतीमुळे मतदारांनी आणि विशेषत: प्रथमच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत जाणून योग्यरितीने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केले आहे.

असे करा मतदान

मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर पुरवलेले जांभळ्या (व्हायलेट) रंगाचे स्केच पेनच वापरावे. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नये. असे केल्यास तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर १  असा आकडा लिहून मतदान करा. १  हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्यावा. 

निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील. उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रम या स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार २, ३, ४ इत्यादी आकडे टाकून दर्शवा.

कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर आपण फक्त एकच आकडा टाकलेला आहे याची खात्री करून घ्यावी. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर टाकलेला नाही याची देखील खात्री करुन घ्यावी. पसंतीक्रम फक्त १, २, ३ इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवावा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नये. पसंतीक्रमाचे आकडे भारतीय अंकाच्या 1, 2, 3 इत्यादींसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.

मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे किंवा अन्य शब्द लिहू नयेत किंवा स्वाक्षरी करु नये. तसेच आपल्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नये. असे केल्यास आपली मतपत्रिका अवैध ठरेल. 

पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर √ किंवा X अशी खूण करणे टाळावे. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. पसंतीक्रम फक्त आकड्यांमध्येच दर्शवावा. 

आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर १ हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच इच्छेनुसार दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवावी.

अशा मतपत्रिका अवैध ठरतील

१  हा आकडा टाकलेला नसल्यास. १  हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर टाकलेला असल्यास. १  हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी टाकलेला आहे याबाबत शंका निर्माण होईल अशाप्रकारे टाकलेला असेल. एकाच उमेदवाराच्या नावासमोर १ आणि त्याबरोबर २, ३ इत्यादी आकडे देखील टाकलेले असतील. पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शवलेला असेल. मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असले, आणि असे आकडे टाकण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा टाकलेला असेल, तरी अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधा व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी;

 निवडणूक साहित्यासह मतदान पथके रवाना

शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान

मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. २२ (जिमाका) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, मतदान प्रक्रिया सुरळीत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली येथील उपविभागीय कार्यालयातील तसेच जलसंपदा विभागातील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मूलभूत सुविधा, प्रवेश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. तसेच सेनगाव तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदान पथके रवाना करण्याच्या प्रक्रियेचीही पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर आणि उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे उपस्थित होते.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, सर्व तहसील कार्यालयांतून निवडणूक साहित्यांसह मतदान पथके संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत.

हिंगोली जिल्ह्यात एकूण १० हजार ३१५ मतदार असून, त्यामध्ये ८ हजार ३३७ पुरुष आणि १ हजार ९७८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदान केंद्रांवरील आवश्यक सुविधा, दिशादर्शक सूचना, मतदान साहित्याची उपलब्धता आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची सज्जता यांची खातरजमा करण्यात आली आहे.

मतदानानंतर मतपेट्या सुरक्षितपणे जमा करण्याची व्यवस्था

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान पेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या विभागीय आयुक्त तथा ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील निर्धारित सुरक्षित कक्षात (स्ट्राँग रूम) पाठविण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी वरिष्ठ उपजिल्हाधिकारी व त्यांचे पथक तसेच पोलीस विभागाचे सशस्त्र सुरक्षा पथक तैनात राहणार आहे. मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक आणि जमा करण्याची प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे. मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील 36 मतदान केंद्रे, पसिरात प्रतिबंधात्मक आदेश लागू : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

              हिंगोली, दिनांक 23 (जिमाका) :  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची आदर्श आचारसंहिता अंमलात आहे. जिल्ह्यातील 36 मतदान केंद्रांवर शुक्रवार, 23 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजता मतदान होणार आहे. या केंद्रांवर भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम 163 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लागू केले आहे. 

            निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टीने, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्र व आजूबाजूचा परिसरात आज (ता.22) रोजी रात्री 10 वाजेपासून 23 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कलम 163 लागू राहील. तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रॉनिक स्मार्ट घड्याळे, निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे, उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध असेल. शिवाय नमूद कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी बैठका घेणे, प्रचार मोहीम घेणे इत्यादीवर निर्बंध असतील. 

        सदरील आदेश प्रत्येकावर तामील करणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश निर्गमित केल्याचे आदेशात नमूद आहे.

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानातून औंढा तालुक्यात आरोग्य चळवळ उभी करावी; जिल्हा आरोग्य अधिकारी- डॉ. कैलास शेळके

 

         पंचायत समिती औंढा नागनाथ येथील सभागृहामध्ये बुधवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या अध्यक्षतेखाली माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न

         गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंता घोरपडे  आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांची उपस्थिती 

        हिंगोली दि. 22 ऑक्टो :- ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि समग्र आरोग्य सेवा उपलब्ध करून देत गावे निरोगी व सशक्त करण्याच्या उद्देशाने 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून पंचायत समिती औंढा नागनाथ येथील सभागृहात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यशाळा आणि आढावा बैठक आयोजित केली होती.

        कार्यशाळेच्या मुख्य सत्रात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके म्हणाले की, "'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' हा उपक्रम केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून, लोकसहभागातून उभी राहणारी एक व्यापक आरोग्य चळवळ आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील प्रत्येक गावपातळीवर आरोग्यदायी वातावरण निर्मिती, स्वच्छता, योग्य पोषण, माता-बाल आरोग्य आणि असंसर्गजन्य आजारांची वेळेत तपासणी करून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी गावातील सर्व घटकांनी आणि आरोग्य यंत्रणेने समन्वयाने काम करणे गरजेचे आहे."

        याप्रसंगी गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी ग्रामपंचायतींच्या भूमिकेवर भर दिला. ते म्हणाले, "गावाच्या समृद्धीचा पाया हा तिथल्या नागरिकांच्या सुदृढ आरोग्यावर अवलंबून असतो. अभियानांतर्गत निर्धारित केलेल्या निकषांनुसार औंढा तालुक्यातील गावांमध्ये १०० टक्के लसीकरण, शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि टीबी मुक्त गाव यांसारख्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा आरोग्य विभागाला पूर्ण पाठिंबा राहील. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनातर्फे पुरस्कृत देखील केले जाईल."

        यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी अनंता घोरपडे  यांनीही मार्गदर्शन करताना ग्रामपंचायत स्तरावरील विविध समित्या आणि आरोग्य यंत्रणेमध्ये ताळमेळ असणे किती गरजेचे आहे, यावर प्रकाश टाकला. लोकसहभाग वाढवून गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी पंचायत समितीचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

        कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि तालुक्याच्या अभियानाची सविस्तर माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी स्पष्ट केले की, "औंढा नागनाथ तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून घराघरांपर्यंत आरोग्य तपासणी व योजना प्रभावीपणे पोहोचवल्या जातील."

        या कार्यशाळेला औंढा नागनाथ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य विभागातील कर्मचारी आणि गट प्रवर्तक, आशा वर्कर उपस्थित होते.

21 October, 2026

खत खरेदीसाठी ‘एफएफएस’ प्रणाली ; हिंगोली जिल्ह्यात २२ ऑक्टोबरपासून लागू

शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खत बुकिंगची सुविधा; शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांक अनिवार्य.

हिंगोली, दि. २१ ऑक्टोबर (जिमाका) : अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली हिंगोली जिल्ह्यात दि. २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना जवळच्या खत विक्री केंद्रावरील खतांची उपलब्धता तपासून घरबसल्या मोबाईलद्वारे खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिली.

बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा

या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या एफएफएस मोबाईल ॲपमध्ये शेतकरी ओळख क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या आधारे प्रवेश करता येईल. त्यानंतर शेतजमिनीचे क्षेत्र प्रमाणित करून पिकाची निवड करावी लागेल. पिकासाठी शिफारस केलेल्या खतांच्या प्रमाणानुसार किंवा स्वतःच्या गरजेनुसार खतांचे प्रमाण निश्चित करून जवळच्या खत विक्रेत्याकडे उपलब्ध खतांचे बुकिंग करता येईल. बुकिंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत संबंधित विक्री केंद्रावर जाऊन बुकिंग क्रमांक दाखवून खत खरेदी करता येईल. शेतकरी स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फतही खत घेऊ शकतील.

खतांची उपलब्धता तपासून खरेदीचे नियोजन शक्य

एफएफएस प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतांचा उपलब्ध साठा मोबाईलवर पाहता येणार असून, गरजेनुसार खत खरेदीचे नियोजन करता येईल. आगाऊ बुकिंगमुळे खत खरेदीसाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक खतांची किंवा इतर कृषी निविष्ठांची खरेदी टाळता येईल. खतांच्या छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास त्यावर आळा घालण्यास आणि खत विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासही या प्रणालीची मदत होणार आहे.

शेतकरी व खत विक्रेत्यांनी सहकार्य करावे

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी तसेच खत विक्रेत्यांनी या पारदर्शक व सुलभ प्रणालीचा अवलंब करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी कृषी विभागाच्या वतीने केले आहे.