16 April, 2020

हिंगोली जिल्ह्यात 5066 मेट्रीक टन अन्नधान्याचे वितरण



·   उर्वरीत 2308 मेट्रीक टन धान्य 18 तारखेपर्यंत उपलब्ध करण्यात येणार
हिंगोली, ‍दि.16: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत असून जिल्ह्यातील 31 हजार 012 शिधापत्रिकाधारकांना आजपर्यंत 5066 मेट्रीक टन अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही शिधापत्रिकामधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 8.43 लाख आहेत. या लाभार्थ्यांना 797 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतंर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 23 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 12 किलो तांदूळ दिला जात आहे. त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जात आहे. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात अंत्योदय योजना-391 मेट्रीक टन, प्राधान्य कुटूंब-3039 मेट्रीक टन, एपीएल शेतकरी-1020 मेट्रीक टन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंत्योदयसाठी-663 मेट्रीक टन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना प्राधान्य कुटूंबासाठी 3812 मेट्रीक टन असे एकुण 9458 मेट्रीक टन गहू व तांदूळ मिळून 797 रास्तभाव दूकानदारांना शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यासाठी देण्यात येत आहे. त्यापैकी 7150 मेट्रीक टन धान्य सर्व रास्तभाव दूकानांत उपलब्ध केले असून, उर्वरीत 2308 मेट्रीक टन धान्य 18 तारखेपर्यंत सर्व दूकानात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आजपर्यंत 5066 मेट्रीक टन धान्य वितरीत करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गावामध्ये अन्नधान्य उचल केल्यावर रास्तभाव दुकानदार यांनी लॉउड स्पिकरद्वारे लाभार्थ्यांना कळवुन अन्नधान्य पुरवठा करावा, रास्तभाव दुकानदार अन्नधान्य वाटप करतांना लाभार्थ्यांना 01 मिटर अंतरावर उभे करणेसाठी मार्कीग करावी व अन्नधान्य वाटप करावे, तसेच मास्क व सॅनिटाईझरचा वापर करण्यासाठी लाभार्थ्यांना व रास्तभाव दुकानदारांना आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
****




No comments: