19 April, 2020

लॉकडाऊनमधुन मनरेगा अंतर्गत येणा-या कामांना आजपासून सुट



हिंगोली,दि.19: जागतिक आरोग्य संघटनेने करोना (कोव्हीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. राज्य शासनाने करोनाचा प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 कायद्यातील खंड 2, 3 4 मधील तरतुदी नुसार अधिसुचना निर्गमीत  केली आहे.  त्याबाबतची  नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. तसेच भारत सरकार आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्रालयाने जाहीर  केल्याप्रमाणे करोनाग्रस्त रुग्णाचे इतर लोकांनी संपर्कात येवू नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे इत्यादी बाबीमुळे या विषाणुचा संसर्ग प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व सामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होवू नये याकरीता फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश देण्यात आले आहे.
            राज्य शासनाने लॉकडाऊन संदर्भात नवीन सर्व समावेशक अधिसूचना जारी केल्या असुन, या अतिरिक्त औद्योगिक घटकासह शेती विषयक बाबी बांधकाम क्षेत्र आदीना अधिक सुट देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टंसींग नियमाचे पालन करुन मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसुचनेत करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने मनरेगा अंतर्गत कामांना लॉकडाऊन च्या काळात सुट देण्यात आली असून त्यामध्ये सिंचन अणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे असे सुचीत केले आहे. त्यानुसार सदरची कामे सुरु करुन काम करते वेळेस सोशल डिस्टींग (सामाजिक अंतराच्या) नियमांचे पालन करुन तसेच मजुरांनी चेह-यावर मास्कचा वापर करुन मनरेगाची कामे करत येणार आहे. सदरील कामे खालील अटी व शर्तीच्या आधारे सुरु करता येतील
कामावर आलेल्या कामगारांची नोंद ठेवणे गरजेचे आहे जसे की, नांव, संपर्काचा पत्ता व मोबाईल क्रमांक., कामगारांनी नेहमीच नाक आणी तोंड माक्सने पुर्णपणे झाकुन ठेवणे बंधनकारक राहणार आहे. कामावर आलेले कामगार यांच्यामध्ये किमान एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता घेवून त्यांच्यासाठी हात धुण्यासाठी सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करुन द्यावेत करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून कामगारांची ने-आण करण्यास मनाई असेल. दररोज कामावर येणा-या कर्मचारी/कामगाराची तपासणी थर्मल गन च्या सहाय्याने करावी. मनरेगा अधिकारी/कर्मचारी /कामगारासाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्यात यावेत. कामाच्या परिसरामध्ये कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी व पाणी उपलब्ध राहील यांची ही दक्षता घ्यावी. शासनाने ठरवुन दिलेल्या अंतराच्या परीसीमाचे तंतोतंत पालन करुन कार्यालयामध्ये व कार्यालयाच्या परीसरामध्ये सामाजीक अंतराचे (Social Distance) पालन करावे व जागोजागी सुरक्षीततेच्या उपाययोजनांचे माहिती फलक लावावेत. 
या आदेशाद्वारे विहित करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती भारतीय दंड संहिता (1860 चा 45) यांच्या कलम 188 अन्वये शिक्षा पात्र असलेल्या अपराध केला आहे असे मानन्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments: