24 April, 2020

हिंगोलीकरांनो घाबरु नका, प्रशासनाला सहकार्य करा -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड



हिंगोली दि.24: शहरातील राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोना (कोविड-19) ची लागण झाली आहे. जवानांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.  करोना विरुध्दच्या लढ्यात निश्चीतच आपल्याला यश मिळेल यात शंका नाही, परंतु या संकटाच्या काळात नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.  
मुंबई व मालेगाव या भागात जोखीमेच्या क्षेत्रात बंदोबस्त करुन परतलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील सहा जवानांना कोरोना (कोविड-19)  लागण झाली,  यानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी प्रशासकीय यंत्रनेकडुन परिस्थीतीचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचा समुह संपर्क होणार नाही यादृष्टीने काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सुचना देताना, जिल्ह्यात सामान्य रुग्णालयातुन एक कोरोना ग्रस्त रुग्ण ठणठणीत बरा झाला असेच हे ही जवान कोरोनाला हरवतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
 कोरोना विरुध्द लढ्यात नागरीकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच सर्व सुजाण नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा वगळता घरीच थांबून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले. 
****

No comments: