25 April, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवित्र रमजान महिन्याकरीता मुस्लीम बांधवांना आवाहन



·   कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे
-         जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली दि.25: जागतीक आरोग्य संघटनेने कोरोना (कोवीड-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य म्हणून घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने प्रसारीत होत आहे. नुकतेच हिंगोली शहरातही कोरोना संसर्ग बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च,2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार केली आहे. तसेच शासनाने दि. 17 एप्रिल,2020 रोजीच्या आदेशान्वये एकत्रीत सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असुन याकरीता आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषीत केले आहे.
सद्या कोरोना संसर्गाची पार्श्वभूमीची परिस्थिती लक्षात घेता, आजपासून मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मूस्लीम समाजात मोठ्या संख्येने मस्जीदमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. त्यामूळे मूस्लीम सामाजातील लोक नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. सद्य परिस्थितीचा विचार करता अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. याकरीता कोरोना विषाणूचा संसर्ग/संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा करणे मूस्लीम समाज बांधवाच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे नाही. त्यामुळे मूस्लीम समाज बांधवांनी सार्वजनिकरित्या / मस्जीदमध्ये एकत्र येवून नमाज अदा न करणे हे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. त्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व मुस्लीम धर्मीय नागरिकांना खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे. या सूचनाचे पालन करुन आपण आपले व आपल्या कुटूंबाच्या आरोग्याचे रक्षण करावे.
यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सुरु असलेला लॉकडाऊनचे ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यात देखील कटाक्षाने करावयाचे आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येवू नये. घराच्या/इमारतीच्या छतावर एकत्र येवून नियमीत नमाज पठण अथवा इफ्तार करु नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमीत नमाज पठण, इफ्तार करु नये. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौटूंबीक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व मूस्लीम बांधवांनी त्याच्या घरातच नियमीत नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मीक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे पालन करावे. कोरोना (कोवीड-19) विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास या रोगाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे. आपण सर्व या आवाहनास प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये व्यक्त केली आहे.
****

No comments: