10 April, 2020

कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज -पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


·   नागरिकांनी घरी राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे

हिंगोली,दि.10: जागतीक आरोग्‍य संघटनेने कोरोना (कोवीड-19) हा विषाणूमूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्‍य आजार म्‍हणून घोषीत केला असुन, कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा प्रशासन कोरोनाशी लढा देण्यासाठी सज्ज असल्याचे पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे आयोजित आढावा बैठकीत सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना महामारीवर काय उपाययोजना केल्या जात आहेत. या संदर्भात आज जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधिक्षक योगेश कुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार तहसीलदार व इतर सर्व विभाग  प्रमुखांशी संवाद साधुन आढावा घेतला.
यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, जिल्हा सामान्य रुग्णांलय 100 खाटांचे रुग्णालय असून या रुग्णांलयास आयसोलेशन वार्ड तयार केला असुन, अल्पसंख्याक मुलांच्या वसतीगृहाचे 100 खाटांच्या रुग्णालयात रुपातंर करुन तिथे देखील आयसोलेशन वार्ड तयार करण्याच्या संबंधीतांना सूचना दिल्या आहे. तसेच  कळमनुरी येथे 50 खाटांचे रुग्णालय असून तेथे आणि कळमनुरी येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचे रुपातंर 100 खाटांच्या रुग्णालयात करुन तिथे देखील आयसोलेशन वार्ड तयार करण्याच्या संबंधीतांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यातील ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहेत तेथील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे रुपातंर देखील गरज पडल्यास आयसोलेशन वार्डमध्ये करण्यात येणार आहे. तसेच टप्या-टप्याने जशी गरज पडेल त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनास जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एक पॉझिटीव्ह रुग्ण असुन त्याची प्रकृती स्थिर आहे. कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिल्ह्याकडे 1 हजार पीपीए किट्स उपलब्ध असून औषधीचा साठा देखील मुबलक आहे. हाइड्रोसील क्लोरोफीलच्या सुमारे 20 हजार गोळ्या उपलब्ध आहेत. तसेच कोवीड रुग्णालयात 2, आयसीयु मध्ये 2, एमआयसीयु मध्ये 1 आणि ऑपरेशन थियटर मध्ये 1 असे एकुण 6 व्हेन्टीलेटर उपलब्ध असुन, आपण जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाकडे अजून वाढीव व्हेन्टिलेटरची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाची स्वॅब तपासणीकरीता आपल्याला औरंगाबाद येथे जावे लागत आहे. परंतू लातूर आणि परभणी येथे या तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्यास सदर अहवाल लवकर प्राप्त होण्यास मदत होईल.
तसेच ग्रामपातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्‌य विभागकडून तलाठी, ग्रामसेवक, आशावर्कर,अंगणवाडी कार्यकर्ती आदी कर्मचारी हे व्हीआरआरटी (Village Rapid Response Team ) पथकाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. 
तसेच जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार जिवनावश्यक वस्तु भाजीपाला, किराणा दुकाने आदी करीता सकाळी 9 ते 1 यावेळेत सुरु ठेवण्यात येत आहे. औषधी दुकानाचे देखील वेळापत्र्क ठरवून दिलेले आहे. शिवभोजन येाजनेच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांना भोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाच्या माध्यमातून 100 एसआरपीएफ आणि  होमगार्ड 100 बाहेरील जिल्ह्यातून आले आहेत. तसेच  सुमारे 14 हजार नागरिक आले असून, या सर्वांच्या आरोग्याची तपासणी सातत्याने करण्यात येत असून प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. 
हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनाशी लढा देण्याकरीता सातत्याने उपाययोजना करण्याचे आपण प्रयत्न करीत आहोत. मधल्या कालावधीत रेशन दूकानदारामार्फत खराब दाळीचे वितरण करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेवून ही दाळ बदलण्यात आली आहे. तसेच रेशन दुकानामार्फत अन्न धान्य वितरीत करतांना सामाजिक अंतर राखले जात आहे. तसेच नागरिकांचे पेन्शन, संजय गांधी निराधार योजना, रोजगार हमी योजना तसेच पीक वीमा आदी कामे करण्याबाबत बँकांना सुचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नागरिकांच्या काही तक्रार असल्यास त्यांच्यासाठी  24 तास जिल्हा नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष दू. क्र. 02456-222560 यावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे अवाहन ही पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.

*****

No comments: