21 April, 2020

शासनाकडून बांधकाम कामगाराना प्रत्येकी दोन हजाराचे अर्थसहाय्य कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा होणार


शासनाकडून बांधकाम कामगाराना प्रत्येकी दोन हजाराचे अर्थसहाय्य
कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा होणार

हिंगोली, दि.21 : राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम कामगाराच्या खात्यात दोन हजार रुपये सरकार कडुन जमा केले जाणार आहेत. लॉकडाऊन मुळे सर्व प्रकारची बांधकामे बंद असून मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोना संकट काळात बांधकाम कामगाराच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान राज्यातील बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी  नोंदीत व सक्रीय( जिवीत ) असलेल्या बांधकाम कामगारांना रु. 2000 एवढे अर्थ सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या खात्यात डी.बी.टी. पध्दतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
                यामुळे हिंगोली जिल्हयात काही लोक (एजंट) तुम्हाला पैसे येणार आहेत, तुमचे कागदपत्र आमच्याकडे द्या असे सांगुन  बांधकाम कामगारांची फसवणुक करत आहेत. अशा प्रकारची व्यक्ती गांवांमध्ये किंवा बांधकाम कामगारास भेटल्यास त्याची तक्रार आपल्या जवळील पोलीस ठाण्यामध्ये देण्यात यावी. सदरील रक्कम ही कामगार आयुक्त मुंबई यांच्या मुख्यालयातुन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी शासन कोणतेही अर्ज / फॉर्म भरुन घेणार नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी दलालाच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडु नये. लॉकडाऊनच्या काळात  सेफ डिस्टन्सचे  तंतोतंत  पालन करुन कोठेही गर्दी करु नये व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी (प्र.) तात्याराव कराड यांनी केले आहे.  
00000


No comments: