29 October, 2026

बालसुरक्षेसाठी विद्यार्थ्यांना कायद्याचे बळ; ‘बोलो, बताओ, बचाओ’चा संदेश हिंगोलीत ‘सुरक्षित बचपन अभियान’द्वारे पॉक्सो कायद्याविषयी जनजागृती; दक्षता सप्ताहात भ्रष्टाचारविरोधी शपथ

 





हिंगोली, दि. २९ ऑक्टो (जिमाका) : बालकांवरील लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध घालणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि गैरवर्तनाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्यास प्रोत्साहित करणे, या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, हिंगोलीतर्फे ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले. या अभियानांतर्गत २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पोदार इंटरनॅशनल स्कूल, शिवाजी महाविद्यालय आणि ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना पॉक्सो कायदा, सुरक्षित-असुरक्षित स्पर्श आणि बालकांच्या कायदेशीर हक्कांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम विशद करून प्रामाणिकतेची शपथ देण्यात आली.


तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम आयोजित करण्यात आले.


पॉक्सो कायद्याची माहिती; गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठविण्याचे आवाहन


पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री. एस. जी. दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात विधिज्ञ ॲड. एन. एस. घुगे यांनी बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बालकामगार प्रतिबंध आणि पॉक्सो कायद्यातील तरतुदींची माहिती दिली. अनुचित स्पर्श करणारी व्यक्ती परिचित किंवा नातेवाईक असली, तरी त्याबाबत पालक अथवा शिक्षकांना सांगण्याचे आवाहन करण्यात आले.


शिवाजी महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री. व्ही. एम. मानखैर होते. ॲड. एम. एम. मोरे यांनी पॉक्सो कायदा मुला-मुली दोघांनाही संरक्षण देतो, हे स्पष्ट करत कायद्यातील तरतुदी आणि गुन्ह्यांच्या स्वरूपाविषयी मार्गदर्शन केले. अनुचित स्पर्श ओळखून त्याला विरोध करावा आणि अशा घटनेची माहिती पालक किंवा शिक्षकांना द्यावी, असे आवाहन श्री. मानखैर यांनी केले.


ए. बी. एम. इंग्लिश हायस्कूल येथे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, श्री. ए. जी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ॲड. एम. एम. गांजरे यांनी पॉक्सो कायद्यातील तरतुदी, गुन्हे आणि शिक्षांची माहिती दिली. ‘बोलो, बताओ, बचाओ’ या संदेशातून बालकांनी गैरवर्तनाच्या घटनांबाबत न घाबरता पालक, शिक्षक, मुख्याध्यापक किंवा विश्वासातील व्यक्तीला सांगावे, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले. बालक स्वतःहून व्यक्त होऊ शकत नसल्यास संबंधितांनी पुढाकार घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’चा संदेश


२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहांतर्गत तिन्ही शैक्षणिक संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम, प्रामाणिकतेचे महत्त्व आणि भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयात प्रा. डी. व्ही. शिराळे यांनी याबाबत विचार मांडले. यावेळी उपस्थितांना भ्रष्टाचारविरोधी शपथ देण्यात आली.


मान्यवरांची उपस्थिती; समितीच्या कर्मचाऱ्यांचे आयोजन


कार्यक्रमांना जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. घुगे, संबंधित शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते. विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संबंधित संस्थांतील प्रतिनिधींनी केले. तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक श्री. डी. बी. हनवते आणि कनिष्ठ लिपिक श्री. एन. एस. दिंडे यांनी शैक्षणिक संस्थांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या अभियानाच्या आयोजनासाठी योगदान दिले.

00000

No comments: