29 October, 2026

मौजे सावा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी; ८ लाख लिटर पाणीसाठा होणार भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा पुढाकार ; पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी जलस्रोतांना मिळणार बळकटी




हिंगोली, दि. २९ ऑक्टो (जिमाका) : सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या जलस्रोतांना बळकटी मिळावी, या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, हिंगोली कार्यालयामार्फत मौजे सावा, ता. जि. हिंगोली येथे २९ ऑक्टोबर 2026 रोजी वनराई (वसंत) बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या बंधाऱ्यामुळे अंदाजे ८ लाख लिटर भू-पृष्ठीय पाणीसाठा निर्माण होणार असून, त्याचा उपयोग सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि काही सिंचन स्रोतांच्या बळकटीकरणासाठी होणार आहे.


भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे येथील आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. बंधाऱ्यासाठी १२ मीटर रुंद, ०.६० मीटर उंच आणि १२० मीटर लांबीपर्यंत पाणीसाठा निर्माण होऊ शकेल, असे योग्य स्थळ निवडण्यात आले होते. या ठिकाणी पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग होण्यास मदत होणार आहे.


*अधिकारी व ग्रामस्थांचे श्रमदान*


वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, सहाय्यक भूवैज्ञानिक दीपक वाबळे, सय्यद आशफाक, रमेश रिठे, राजेश राठोड, अनिल सोळंके, प्रफुल्ल विणकरे, भारत खुडे, संतोष बेले, पंढरीनाथ शिंदे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी श्रमदान केले. स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

00000

No comments: