30 October, 2026

बालकांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षित बचपन अभियान’;बाल लैंगिक शोषण व बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती


हिंगोली (जिमाका), दि. ३० : बालकांचे लैंगिक शोषण रोखणे, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथांविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांच्या वतीने अनसूया विद्या मंदिर येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ राबविण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत एल. आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२ संदर्भात अखिल भारतीय शालेय जनजागृती मोहिमेंतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जी. दुबाले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा वकील संघाचे विधिज्ञ ॲड. डी. बी. खंदारे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एस. आर. घुगे आणि अनसूया विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज ऑफ एन्ट्रन्सचे प्राचार्य पी. आर. गुरुसुडे उपस्थित होते.

यावेळी ॲड. डी. बी. खंदारे यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींसोबत जाणे टाळावे, अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत, वैयक्तिक अवयवांना चुकीच्या हेतूने स्पर्श केल्यास स्पष्टपणे विरोध करावा, तसेच अशा प्रकारचा अनुचित प्रसंग घडल्यास न घाबरता शिक्षक, पालक किंवा विश्वासू व्यक्तींना तातडीने सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय समारोपात न्यायाधीश एस. जी. दुबाले यांनी अभियानाची ‘ना बालविवाह, ना बालशोषण’ ही संकल्पना स्पष्ट केली. बालविवाह हा बालकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि शोषणाचा प्रकार असल्याचे सांगून बालविवाह करणे तसेच लावणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांनी नमूद केले. मुलीचे विवाहाचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. परिसरात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देऊन असे विवाह रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना बालसुरक्षेविषयक माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ या संकल्पनेअंतर्गत ॲड. खंदारे यांनी भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी नागरिकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात सहशिक्षक के. व्ही. सूर्यवंशी यांनी भ्रष्टाचार रोखण्याबाबत उपस्थितांना शपथ दिली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहशिक्षक एस. एस. परांडे यांनी आभार मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी. बी. हनवते व कनिष्ठ लिपिक एन. एस. दिंडे यांनी शाळेतील शिक्षकांच्या सहकार्याने अभियान यशस्वी केले.
00000

No comments: