30 October, 2026

गावांना जलसमृद्ध करण्यासाठी ‘वॉटर कप’अभियानासाठी गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता


*‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाच्या नियोजनासाठी बैठक संपन्न*

हिंगोली, दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाची दाहकता अधिक असलेल्या गावांना पाणीदार व दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. यासाठी प्रत्येक तालुक्याने दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या गावांची यादी तयार करावी. तसेच या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक गावातील ५ ते ६ व्यक्तींची निवड करून त्यांची नावे प्राधान्याने सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाच्या नियोजनासाठी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगनवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, जलसंधारण व मृदसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली ढोके, पाणी फाउंडेशन विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

टंचाईग्रस्त गावांची निवड करून आतापासूनच नियोजन करा

जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने आतापासूनच विविध उपाययोजनांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सर्व तालुक्यांच्या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या असून, संबंधित यंत्रणांना टंचाई आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, दीर्घकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिक असलेल्या गावांची प्राधान्याने निवड करावी. प्रत्येक गावातून ५ ते ६ इच्छुक, सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या आणि प्रत्यक्ष काम करण्याची तयारी असलेल्या व्यक्तींची प्रशिक्षणासाठी नावे निश्चित करावीत. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी असलेल्या गावांचाही या उपक्रमात समावेश करावा, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारणार

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येणारी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ ही जलसंधारण व पाणलोट व्यवस्थापनावर आधारित महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.

पाणी फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून पाणी आणि शेती या विषयांवर ग्रामीण भागात प्रशिक्षण, जनजागृती व लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित आहे. या कार्याला शासनाचेही सहकार्य मिळत आहे. नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान व त्यांच्या सहकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत यंदा संपूर्ण महाराष्ट्रात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातही आगामी काळात जलसंधारणाची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे स्वरूप, अंमलबजावणीची पद्धत, विविध शासकीय विभागांची भूमिका आणि विभागनिहाय सहकार्य याबाबत पाणी फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
जलसंधारणाची कामे केवळ शासकीय यंत्रणांपुरती मर्यादित न ठेवता ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, गावपातळीवरील नेतृत्व आणि विविध विभागांचा समन्वय यांद्वारे व्यापक लोकचळवळ उभी करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. गावांनी एकत्रित प्रयत्न केल्यास पाणीटंचाईवर मात करून जलसुरक्षित व दुष्काळमुक्त गावांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.
00000

No comments: