24 May, 2023

 

महाज्योतीच्या जेईई दुसर्‍या सत्रातील विद्यार्थ्यांचे सुयश

10 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यावर परसेंटाईल स्कोर

महाज्योतीच्या प्रशिक्षकांना दिले श्रेय !

 



हिंगोली (जिमाका), दि. 24 : जेईई म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. जेईई मेन्स आणि जेईई एडव्हांस अशी दोन टप्प्यांत होणारी परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटीमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाते. नुकताच जेईई मेन्सच्या दुसर्‍या सत्राचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जाहीर करण्यात आलाय. त्यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या जेईई प्रशिक्षण योजनेतील 10 विद्यार्थी 90 टक्क्यावर परसेंटाईल स्कोर घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. तर इतर विद्यार्थी 80 ते 85 परसेंटाईल स्कोर घेऊन मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झालेली आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय महाज्योतीला दिलेले आहे.

अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई या परिक्षेचे प्रशिक्षण महाज्योती मार्फत मोफत देण्यात येते. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब तसेच इंटरनेट डाटा पुरविला जातो. अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकाचा संच घरपोच दिल्या जातो. तज्ञ प्रशिक्षकांव्दारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाते. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

मा.ना.श्री. अतुल सावे मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण, सरकार तथा अध्यक्ष महाज्योती, नागपूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच महाज्योती तर्फे राबविण्यात येणाऱ्या जेईई/नीट/एमएचटी-सीईटी या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. मा. श्री राजेश खवले व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर यांनी जेईईच्या दुसर्‍या सत्रात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जेईईच्या दुसर्‍या सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत

जेईई प्रशिक्षण योजनेसंदर्भात ऑनलाईन माहिती मिळाली. सर्व प्रक्रिया पुर्ण करुन नाव नोंदवले. काही दिवसानी माहाज्योतीच्या मुख्य कार्यालयाकडून निवड झाल्याचे कळविण्यात आले आणि प्रशिक्षणास सुरवात झाली. प्रशिक्षणा दरम्यान टॅब आणि पुस्तकाचा संच मिळाला. इंटरनेटची सुविधा पुरवण्यात आली. अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सराव करुन घेतला. अडचणींना दुर सारून आत्मविश्वास वाढवला. या यशाचे श्रेय निश्चितच महाज्योतीला आणि तेथील अनुभवी प्रशिक्षक वर्गाला जाते.

-आकांक्षा वरकड, वर्धा

शाळेत असतांना पासून इंजिनियरींग बनण्याचे स्वप्न होत. पण जेईईचे महागडे कोचींग परवडण्यासारखे नव्हते. महाज्योतीच्या जेईई प्रशिक्षण योजनेची माहिती मित्राकडून मिळाली. ऑनलाईन नोंदणी केली. थोड्याच दिवसात निवड झाल्याचे कळवण्यात आले. आणि ऑनलाईन प्रशिक्षणास सुरवात झाली. मोफत टॅब, मोबाईल डाटा पुरवण्यात आला. त्याचा जेईईच्या तयारीसाठी खुप फायदा झाला. ऑनलाईन प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शंकेचे निरसन केल्या गेले. अधिकाधिक सराव करुन घेतला आणि मी दोन्ही सत्रात पास झालो. मला पहिल्या सत्रात 92 तर दुसर्‍या सत्रात 95 पर्सेंटाईल गुण मिळवता आले.

- यश मनोज वाझुळकर, वाशीम

****

No comments: