30 May, 2023

 

खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 


हिंगोली (जिमाका), दि. 30 : सर्व बँकानी योग्य नियोजन करुन सन 2023-24 च्या खरीप पीक कर्जाचे जून अखेरपर्यंत जास्तीत पिक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. 29 मे, 2023 रोजी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख जिल्हा व्यवस्थापक शशीकांत सांवत, आरबीआयचे नरसींग कल्याणकर, एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक धनाजी बोईले,  विविध बँकेचे अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, चालू वर्षात खरीप पीक कर्जाचे वितरण 13.91 टक्के झाले आहे. सर्व बँकानी जून अखेर पर्यंत जास्तीत जास्त पीक कर्जाचे वितरण करुन वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत. यासाठी गावात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करण्यात यावेत. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री स्वनिधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यासह विविध योजनेच्या प्रलंबित प्रकरणाचा तात्काळ निपटारा करावा. तसेच आरसेटी मार्फत प्रशिक्षण दिलेल्या लाभार्थ्यांना त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज देण्यात यावे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी नवीन शाखेची मागणी आहे, त्या ठिकाणी नवीन शाखा सुरु करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. 

गत सन 2022-23 या वर्षामध्ये 988.81 कोटी रुपयाचे पीक कर्ज वितरण करुन 81.58 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बँकाचे अभिनंदन केले.

******

No comments: