10 May, 2023

 

गांव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले रस्ते तात्काळ मोकळे करावेत

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 :  हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या सर्व गावामध्ये गांव नकाशाप्रमाणे चिन्हांकित असलेले गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते यावर अतिक्रमण करणारे शेतकऱ्यांनी तात्काळ आपले अतिक्रमण काढून घ्यावेत व नकाशाप्रमाणे रस्ता मोकळा करावेत. जर अतिक्रमण काढून घेतले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे सुरु असून त्याअंतर्गत गांव नकाशाप्रमाणे चिन्हांकित असलेले गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते यावर असलेले अतिक्रमण मोकळे करण्याचा कार्यक्रम करण्यात येत आहे. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटा मुक्तीचे सर्व पदाधिकारी तसेच पोलीस पाटील आणि प्रतिष्ठित नागरिक, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यामध्ये सहभागी आहेत.

ज्या शेतकऱ्यांना गांव नकाशाप्रमाणे चिन्हांकित असलेले  गाडी रस्ते, पाणंद, पांधण, शेतरस्ते, शिवाररस्ते यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे शेतात जाणे-येणे करणे, मालाची ने-आण करण्यासाठी अडथळा होत असेल, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये रस्ते मोकळे करण्यासाठी लेखी अर्ज करावे व त्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहेत.

*****

No comments: