17 May, 2023

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे

हिंगोली, कळमनुरी, औंढा व वसमत येथे 18 मे रोजी आयोजन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : समस्याग्रस्त पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळण्यासाठी  महिलांना सुलभ  मार्गदर्शनाची  सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो.

महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर महिलांसाठी  शासनाच्या  विविध  विभागांमार्फत  राबविण्यात  येत असलेल्या योजनांची  माहिती  महिलांना  उपलब्ध  करुन  देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण  करण्यासाठी  एक व्यासपीठ  उपलब्ध करुन  देण्यासाठी  महिला बालविकास विभागाच्या दि. 9 मे, 2023 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांनुसार महिलांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यात दि. 15 मे दि. 31 मे, 2023 या कालावधीत तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने हिंगोली व कळमनुरी येथे तहसील कार्यालयात तसेच औंढा नागनाथ व वसमत येथे पंचायत समिती कार्यालयात तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली  दि. 18 मे, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर "स्त्री शक्ती समाधान शिवीर’’ आयोजित करण्यात आले आहे.

तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत, महसूल, कृषी, आदिवासी आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, अन्न व नागरी  पुरवठा (रेशन), शिक्षण, पोलीस (गृह), पाणी  पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (रस्ते), महावितरण (विद्युत विभाग), आरोग्य, विधीसेवा प्राधिकरण इत्यादी  सर्व विभागाच्या, महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निरसन  या शिबिरामध्ये  करण्यात येणार आहे. तक्रारदार तसेच पीडित महिलांनी बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) , हिंगोली, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी यांच्या कार्यालयास संपर्क साधून दि. 18 मे, 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर स्त्री  शक्ती  समाधान शिबिरात आपल्या समस्यांबाबतचा विहित नमुन्यातील तक्रार अर्ज गूगल फॉर्म क्यू आर कोड  किंवा ऑफलाईन फॉर्म 2 प्रतीमध्ये सादर करावा.

या समाधान शिबिरास हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर यांनी केले आहे.

*****

No comments: