30 May, 2023

 

विजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी  नागरिकांनी खबरदारी घ्यावी

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 30 :  विजेच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी दि. 30 मे, 2023 रोजी घेतलेल्या औरंगाबाद विभागाच्या बैठकीत वीज पडून नागरिकांचा मृत्यू तसेच पशुधनाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत आढावा घेतला. तसेच दरवर्षी होणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी जिल्हास्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

दरवर्षी अंगावर वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक तसेच जनावरे मरण पावतात अथवा दुर्घटनाग्रस्त होतात. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.  

                           

आकाशात विजा चमकत असल्यास हे करा :

1)      आकाशात विजेचा कडकडाट होत असताना शेतकऱ्यांनी तसेच नागरीकांनी तात्काळ शेताजवळील घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.  

2)     जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. तसेच विजेपासून बचावासाठी दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे गुडघ्यामध्ये झुकवा व डोके जमिनीवर टेकणार नाही याची काळजी घ्या.

3)      झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे.

4)    वीजवाहक वस्तूपासून दूर रहा, उदा. विजेचे खांब, टेलीफोन खांब, लोखंडी पाईप ई. पासून दूर राहावे.

5)     वीज पडल्यास प्राथमिक उपचारासाठी मुख्यतः हृदय व श्वसन प्रकियेत अडथळा येतो. त्यामुळे विद्युतघात झाल्यास लगेच हृदयाच्या बाजूने मालीश करावी. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी.

6)     विजा चमकत असल्यास संगणक, विद्युत उपकरणे बंद करुन ठेवावीत.

7)     वादळी वाऱ्यासह, पावसाची शक्यता देखील असल्याने शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी यानुसार आपापल्या कामाचे नियोजन करावे.

 

आकाशात विजा चमकत असल्यास हे करु नका :

1)      पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तात्काळ बंद करावा.   

2)     विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली आश्रय घेऊ नका.

3)      दोन चाकी, सायकल यावर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा.

4)    धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करु नका. 

 

*******

No comments: