04 May, 2023

 

कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी एमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास

तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार नोंदवावी

                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* शेतकऱ्यांनी रासायिनक खतांच्या विशिष्ट ग्रेडची मागणी न करता उपलब्ध खतांमधून गरज भागवावी

* किमान 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन बियाणांची पेरणी करु नये

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी एमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास अथवा इतर कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी मुळ खरेदी बीलासह वेळीच तालुका, जिल्हा तक्रार निवारण कक्षाकडे लेखी स्वरुपात तसेच भ्रमणध्वनीव्दारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा सनियंत्रण समितीची खरीप हंगाम सन 2023 पूर्व तयारी आढावा बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दि.03 मे, 2023 रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, कृषि विकास अधिकारी निलेश कानवडे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ.पी.पी. शेळके, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सागर सावरकर, एमएआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक पी.आर. फड, सहाय्यक व्यवस्थापक नंदकिशोर शेवाळे, जिल्हा पणन अधिकारी शेवाळे उपस्थित होते.

यावेळी खरीप आढावा सविस्तर चर्चा करताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, शेतकऱ्यांनी रासायिनक खतांच्या विशिष्ट ग्रेडची मागणी न करता उपलब्ध रासायनिक खतांमधून गरज भागवावी. उदा. डीएपी ऐवजी युरिया+एसएसपीचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने युरिया ऐवजी नॅनो युरिया व पाण्यात विद्राव्य इतर रासायनिक खताच्या ग्रेडचा वापर करावा. त्यासाठी कृषि विभागाने गाव पातळीवर प्रचार व प्रसिध्दी मोहिम राबवावी. कृषि विभागामार्फत शंभर टक्के कृषि निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करुन बोगस, अवैध कृषि निविष्ठांची साठवणूक, विक्रीस वेळीच प्रतिबंध करुन कारवाई करावी. बियाणे विक्रेत्यांनी 01 जुन पूर्वी बीटी कापूस बियाणांची विक्री करु नये. शासनाची मान्यता नसलेल्या एचटीबीटी कापूस बियाणांची बियाणे विक्रेत्यांनी खरेदी-विक्री व साठवणूक करु नये. शेतकऱ्यांनीही बाहेरच्या राज्यातून छुप्या पध्दतीने एचटीबीटी कापूस बियाणे जिल्ह्यात आणू नये वा त्याची पेरणी करु नये. तसे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, याबाबत पोलीस अधीक्षक यांनाही लेखी पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी महिनानिहाय मंजुर आवंटनानुसार रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा करावा. रेक लागण्यापूर्वी किमान 02 दिवस अगोदर रासायनिक खतांच्या पुरवठ्याचे नियोजन कृषि विभागास सादर करावे. त्यानुसार पोलीस विभागास रासायनिक खतांच्या वाहतुकीसाठी परवानगीबाबत उचित कार्यवाहीसाठी कळविण्यात येईल. सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी त्यांच्या बियाणे, खते व किटकनाशकांच्या परवान्यामध्ये विक्री करीत असलेल्या सर्व उत्पादकांच्या व उत्पादनांचा समावेश करुन घ्यावा. कृषि निविष्ठा उत्पादक कंपन्यांनी कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे ऑनलाईन परवान्यातील उगम प्रमाणपत्रास (Form ‘O') वेळीच मान्यता देण्याची व्यवस्था करावी. परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसलेल्या कृषि निविष्ठा विक्रेत्यांना कृषि निविष्ठांचा पुरवठा करणाऱ्या बियाणे, खतांच्या उत्पादक कंपन्या देखील कारवाईस पात्र राहतील. कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी कृषि निविष्ठांच्या साठवणूकासाठी गोदामाच्या जागेचा समावेश आपल्या परवान्यामध्ये करुन घ्यावा. परवान्यामध्ये समाविष्ट नसलेल्या जागेत कृषि निविष्ठांची अवैध साठवणूक करु नये. रासायनिक खत उत्पादक कंपनीने घाऊक विक्रेत्यांना घाऊक विक्रेत्याने किरकोळ विक्रेत्यांना व किरकोळ विक्रेत्याने शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री / Linking करु नये, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिले.

आधार कार्डधारक शेतकऱ्यांना एमआरपी दरानेच PoS मशिन व्दारे ऑनलाईन रासायनिक खतांची विक्री करावी. तसेच Pos वरील ऑनलाईन रासायनिक खतांचा व गोदामातील रासायनिक खतांचा प्रत्यक्ष साठा नियमित जुळवून अद्यावत ठेवावा. बोगस बियाणे आणि खतांची खरेदी-विक्री व साठवणूक करु नये. पुरवठा व साठवणूक केलेल्या बियाणांचे Release Order / Statement 1-2 संग्रही ठेवावे शेतकऱ्यांकडील शेतकरी उत्पादक संघाकडील व बियाणे उत्पादक कंपन्यांनी पुरवठा केलेल्या सोयाबीनच्या जास्तीत जास्त बियाणांची पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करुन घ्यावी. किमान 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन बियाणांची पेरणी करु नये, पेरणीपूर्वी किटकनाशक / बुरशीनाशकाची बीज प्रक्रीया करुनच पेरणी करावी. सोयाबीनसाठी युरिया खताचा वापर टाळावा. दाळवर्गीय पिकांना रायझोबियम (Rhizobium) व सर्वच पिकांना PSB, KSB चा वापर करावा, परवानाधारक अधिकृत विक्रेत्याकडूनच पक्की पावती घेऊन बियाणे खरेदी करावे. पेरणीनंतर बियाणे खरेदीची पावती, बियाण्याच्या पिशवीचे लेबल / पाकीट व मुठभर बियाणे हंगाम संपेपर्यंत संग्रही ठेवावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी केल्या.  

या बैठकीमध्ये कृषि विकास अधिकारी श्री. कानवडे यांनी हिंगोली जिल्ह्याचे खरीपातील एकूण 4 लाख 24 हजार 589 क्षेत्रापैकी खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन 2 लाख 55 हजार (60 टक्के), तूर 38 हजार 418 (9 टक्के) व कापूस 32 हजार 159 (7.50 टक्के) हेक्टर इत्यादी प्रमुख पिकांखालील प्रस्तावित क्षेत्र असून त्यासाठी सोयाबीन वगळता 6174.94 क्विंटल व सोयाबीनच्या 66 हजार 937 (35 टक्के बियाणे बदल दरानुसार) क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. ग्राम बिजोत्पादनाव्दारे तयार केलेले 2 लाख 41 हजार 750 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील प्रस्तावित 4 लाख 24 हजार 589 हेक्टर पेरणी क्षेत्रासाठी एकूण 95 हजार 729 मे.टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार कृषि आयुक्तालयाने हिंगोली जिल्ह्यासाठी 77 हजार 610 मे.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजुर केले आहे. माहे मार्च, 2023 अखेर शिल्लक 32 हजार 682 मे. टन व माहे एप्रिल 2023 मध्ये प्राप्त 6 हजार 868 मे. टन असे एकूण 39 हजार 550 मे.टन (50 टक्के) रासायनिक खते खरीप हंगाम 2023 साठी उपलब्ध असून आज रोजी हिंगोली जिल्ह्यात 37 हजार 78 मे.टन रासायनिक खतांचा साठा शिल्लक असल्याचे सांगितले.

यावेळी मोहिम अधिकारी , जिल्ह्यातील पाचही पंचायत समितीचे गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषि अधिकारी, रासायनिक खत उत्पादक कंपन्यांचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, जिल्ह्यातील घाऊक रासायनिक खत विक्रेते व रासायनिक खत वाहतूकदार उपस्थित होते.

*****

No comments: