01 May, 2023

 

उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा

- पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी  खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज आयोजित केलेल्या बैठकीत केले आहे.

काय करावे :-

  •  उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
  •  तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
  • हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
  • जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
  • अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
  •  गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
  • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात  यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
  •  कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
  • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

काय करु नये  :-

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 3.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इ. यांचा वापर टाळावा.
  • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे.

*****

No comments: