05 April, 2024

निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांच्याकडून दूरस्थ मतदान केंद्रांची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 05 : हिंगोली लोकसभा मतदारसंघात आदर्श आचासंहिता लागू झाली असून, निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांनी आज जिल्ह्यातील दूरस्थ मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली. यावेळी संपर्क अधिकारी सुनील शिंदे, श्रीमती पुष्पा पवार व नायब तहसीलदार श्री. गायकवाड उपसि्थत होते. हिवरखेडा, बोरखेडी, लिंबाला व भंडारी या दूरस्थ मतदान केंद्रास भेटी देऊन तेथील मूलभूत सुविधाची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वच्छतेसह इतर सर्व आवश्यक सुविधेसोबतच उन्हापासून बचावासाठी शेड व पिण्याचे पाणी या दोन सुविधा प्रामुख्याने उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपस्थित अधिकारी श्री. गायकवाड यांनी निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना यांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपास्थित होते. तसेच त्यांनी गावातील मतदारांशी संवाद साधला. मतदानावेळी मतदारांना किमान आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सर्व संबंधितांनी मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री केली. या दूरस्थ मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने त्यांनी पाहणी केली. मतदान केंद्रांवर आवश्यकतेनुसार डागडुजी, दुरुस्ती, सर्व मतदान केंद्रांवर प्रकाश, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींच्या व्यवस्थेची पाहणी केली. ज्या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदार मतदान करतील तेथे व्हीलचेअर व स्वयं सेवकांची व्यवस्थेचीही तपासणी केली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याच्या पुरेशा उपलब्धतेची दक्षता घेऊन आयोगाच्या सूचनांनुसार आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदान केंद्रावर पोहोचण्यास मतदाराना त्रास होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. मतदानाची तारीख लक्षात घेता सावलीची व्यवस्था तसेच रांगेचे नियोजन करावे. सर्व मतदार केंद्रावर प्रथमोपचार सुविधा देताना आवश्यक औषधे मतदान केंद्रावर उपलब्ध ठेवण्यात यावीत, असे निर्देश निवडणूक निरीक्षक श्रीमती अर्चना यांनी दिले. *****

No comments: