31 December, 2024
ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार
• ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 31 (जिमाका) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पुणे येथील आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांचेकडून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास जिल्ह्यातील साखर कारखान्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्या आहेत. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपसंचालक साखर विश्वास देशमुख यांनी केले आहे.
भाऊराव चव्हाण ससाका लि. डोंगरकडा, ता. कळमनुरी साठी शेतकी अधिकारी व्ही.एम. जोशी मो. ९१४५०४६१७५, पुर्णा सहकारी साखर कारखाना, वसमतनगर साठी जनसंपर्क अधिकारी आर. पी. गुंडाळे, ९४२१३८१३१४, कपीश्वर शुगर अँड केमिकल लिमिटेड, जवळा बाजार, ता. औंढा नागनाथ, मुख्य शेतकी अधिकारी आर. एस. देशमुख, ९८८१९०४५५५, टोकाई सहकारी साखर कारखाना कुरुंदा, ता. वसमतनगर साठी शेतकी अधिकारी पी. जी. गायकवाड ९४२२१७६०९८, शिऊर सहकारी साखर कारखाना प्रा. लि. वाकोडी, ता. कळमनुरी मुख्य शेतकी अधिकारी एम. व्ही. पतंगे ९४०४९००८२८यांच्याशी संपर्क साधावा.
ऊस तोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून रोख पैशांची व अन्य वस्तू / सेवा यांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते / ऊस योग्य प्रकारे तोडला गेला नाही अशा प्रकारच्या आर्थिक पिळवणूकीच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहेत.
राज्यात चालू 2024-25 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करू नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाच्या संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार असून कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही याचे नियोजन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा स्वरुपाच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणुक करुन तक्रारनिवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये कारखान्याच्या गटऑफिसवर व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. याबाबतची व्यापक प्रसिद्धी सर्व प्रसिद्धी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याकडे परिशिष्ट-अ मधील नमुन्यात घटना घडल्यावर लगेच करावी व त्याची पोहच घ्यावी. या कामाकरिता नेमलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर तक्रारीचे निवारण सात दिवसात करावे.
तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांनी सदरची रक्कम मजूर, मुकादम, वाहतुक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करावी. सदर तक्रारीचे निवारण कारखान्याकडून न झाल्यास नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड यांचा rjdsnanded@rediffmail.com ईमेलवर तक्रार करावी व प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सत्यता पडताळून प्राप्त तक्रारीचे निवारण करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
00000
जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याविषयी जनजागृती
हिंगोली, दि.31 (जिमाका): हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या माध्यमातून जवळा खंदारबन येथे आयोजित शिबिरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव तसेच हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. श्रीकांत एस. गावंडे, राष्ट्रीय सेवा योजना महिला सह कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एस. पाटील व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. एन. के. आकमार उपस्थित होते.
महिला सबलीकरण व बालविवाह एक समस्या या विषयावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीम. सरस्वती कोरडे यांनी दैनंदिन जिवनात महिला विविध भूमिका पार पाडताना समाजाच्या आधारस्तंभ बनल्या असल्याचे सांगून, सर्व भूमिका अत्यंत कुशलतेने निभावत आहेत. महिला ही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सबल होत असल्याचे सांगितले. परंतु सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबीत्व यातून स्त्रियांची सुटका करण्यासाठी महिला सबलीकरण काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी सक्षम समाजनिर्मितीसाठी बालविवाह, त्याची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीची 18 व मुलाची 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपयांचा दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून, या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत व याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बालक म्हणजे काय व बालकांकरीता तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, अशी माहिती गावकऱ्यांना दिली.
विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत सोनटक्के, कु. प्रणाली कांबळे व सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्यार्थी, किशोर वयीन मुले-मुली व गावातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते.
******
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम शासकीय जिल्हा ग्रंथालयात 1 ते 15 जानेवारी दरम्यान ‘ग्रंथप्रदर्शन’
हिंगोली, दि. 31 (जिमाका) : राज्यभर 1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पंधरवाड्यादरम्यान येथील शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 20 डिसेंबर 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करुन या विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा अभिनव उपक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, चर्चा, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग व सभासद नोंदणी करण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग व जिल्हास्तरीय समित्यांची रचना करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय जिल्हा ग्रंथालयात 1 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून नागरिक, वाचक, सभासद, विद्यार्थी, अभ्यासक यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथपाल त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
000000
वितरकांकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्याचे वाहनधारकांना आवाहन
हिंगोली, दि. 31, (जिमाका): सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2024 पूर्वी नवीन उत्पादित वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार या वाहनांना एसएसआरपी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक असून वाहन वितरकांद्वारे ही नंबर प्लेट बसविण्यात येणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी ती वितरकांकडून बसवून घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
वाहनाचे नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे शासनाने निर्देश दिले आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोलीसाठी M/s FTA HSRP Solution Ptv Ltd. ही एजन्सी असून HSRP बुकींग पोर्टल लिंक http://maharashtrahsrp.com हा आहे. या करिता नेमण्यात आलेल्या पुरवठादाराची यादी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर लावण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी दि. 1 एप्रिल 2024 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP तात्काळ बसवून घ्यावी. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा वरील लिंकवर देण्यात आली असून शुल्क भरणा ऑनलाईन करावा, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
0000000
27 December, 2024
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन • प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 पर्यंत
हिंगोली (जिमाका), दि. 27 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2024 करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2025 पर्यंत पाठविता येणार आहेत. दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत.
या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व what’s new या सदरात Late Yashwantrao chavan state Literature Award 2024 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक त्या साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2025 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकाच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदीर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025 येथे पाठवाव्यात.
मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2025 या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर, पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), हिंगोली यांनी कळविले आहे.
******
निरीक्षणगृह व बालगृहात विविध कार्यक्रमांनी ' वीर बाल दिवस ' साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतिक म्हणून 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान यांनी केली आहे. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह, सावरकर नगर, हिंगोली व श्री स्वामी समर्थ बालगृह, खानापूर (चित्ता) ता. हिंगोली येथे वीर बाल दिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात चित्रकला तसेच माझे स्वप्न भारतासाठी आणि मला कशामुळे आनंद होतो, या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच प्रवेशित बालकांना वीर गाथा दाखविण्यात आली. कार्यक्रमामध्ये बालकांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, निरीक्षण गृहाचे प्र.अधीक्षक शंकर घ्यार, काळजीवाहक सिंधू भिसे, बालगृह अधीक्षक रमेश पवार, चाईल्ड हेल्प लाईनचे राजरत्न पाईकराव, तथागत इंगळे, बालगृहातील प्रवेशित बालकांची उपस्थिती होती.
*******
अवैध गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृतीवर सक्तीने नियंत्रण ठेवा-जिल्हाधिकारी
* जनतेनी अवैध मार्गाने गौण खनिज खरेदी करु नये
हिंगोली (जिमाका),दि.२७ : गौण खनिजाशी संबंधी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांचा परिणामकारक समन्वय साधण्यासाठी आणि अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ डिसेंबर, २०२४ रोजी महसूल, पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी अवैध गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीशी संबंधित अपप्रवृतीवर सक्तीने नियंत्रण व परिणामकारक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या . तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने जनतेने अवैध मार्गाने कोणत्याही प्रकारचे गौण खनिज खरेदी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
******
26 December, 2024
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली (जिमाका), दि. 26 : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर ह्या उद्या, दि. 27 डिसेंबर, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता परभणी येथून सेनगाव जि.हिंगोलीकडे प्रयाण. 3 वाजता सेनगाव येथील व्ही. के. मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमास उपस्थिती व मार्गदर्शन करतील. सायंकाळी 5 वाजता सेनगाव येथून जुना पेडगाव रोड, परभणी येथील निवासस्थानाकडे प्रयाण.
******
डाक विभागाच्या राष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेस 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या ‘ढाई अक्षर’ या पत्रलेखन स्पर्धेची आता मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवलेली असून या पत्र लेखन स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थी आणि जनतेने जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.
या पत्रलेखनाचा विषय ‘लिखाणाचा आनंदः डिजिटल युगात पत्रांचे महत्त्व’ असा असून, पत्र कोणत्याही भाषेमधून लिहिता येणार आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात असून, 0 ते 18 आणि 18 वर्षापासून पुढे अशा दोन गटात होणार आहे. त्याकरिता स्पर्धकांनी 1 जानेवारी 2024 'माझे वय 18 पेक्षा कमी/जास्त आहे, असा स्पष्ट उल्लेख करावा, तसेच आपले नाव, पत्ता व वयाचा उल्लेख करावा. जसे कि 'मी असे प्रमाणित करतो कि माझे वय दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षापेक्षा अधिक किंवा 18 वर्षापेक्षा कमी आहे.’
हे पत्र मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई- 400001 यांच्या नावाने लिहून जवळच्या पत्रपेटीत किंवा टपाल कार्यालयात द्यावयाचे आहे. ए-4 साईजच्या कोऱ्या कागदावर 1000 शब्दमर्यादेत लिहावे. आंतरदेशीय पत्राचा वापर केल्यास 500 शब्दांची मर्यादा आहे. हे पत्र 31 जानेवारी 2025 पर्यंत असून, मुदतीनंतर प्राप्त पत्रांचा स्पर्धेत समावेश होणार नाही. दोन्ही वयोगटासाठी पाकीट आणि आंतरदेशीय पत्र अशा दोन्ही गटात एकूण अनुक्रमे प्रत्येकी 4 प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडले जातील.
निवड झालेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी राज्यस्तरावर प्रथम 25, द्वितीय 10 आणि तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये प्रदान करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर प्रत्येक गटातून निवड झालेल्या तीन उत्कृष्ट पत्रांना राष्ट्रीय स्तरावर पाठवण्यात येईल आणि राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या उत्कृष्ट पत्रांसाठी अनुक्रमे 50, 25 आणि 10 हजार रुपयांचे रोख पारितोषक देण्यात येणार आहे. तरी या लेखन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन डाक अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी केले आहे.
******
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेशाकरिता 23 फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा • 10 जानेवारीपयंत अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 26 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांच्या अधिनस्त असलेल्या प्रकल्प कार्यालयातंर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजन करण्यात आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत प्रवेश परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत इयता 6 वी, तसेच इयत्ता 7 वी ते 9 वीची वेळ सकाळी 11 ते 2 या वेळेत शासकीय आश्रमशाळा जामगव्हाण ता. कळमनुरी जि. हिंगोली येथे घेण्यात येणार आहे.
प्रवेश परीक्षेकरिता विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज कळमनुरी प्रकल्प कार्यालय व कार्यालयातंर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकाकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. कार्यालयातंर्गत येणा-या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक सत्र 2024-25 वर्षात इयता 5 वी ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण भरलेले विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज संबधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे 10 जानेवारी, 2025 पर्यंत सादर करण्याचे आवाहन कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
******
25 December, 2024
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम
हिंगोली (जिमाका), दि. २५ : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम १ ते १५ जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. या उपक्रमात सर्व ग्रंथसंपदेचे एकत्रीकरण, वाचनालय सुशोभीकरण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. यामध्ये जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरू नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे व जिल्ह्यातील २४५ सार्वजनिक ग्रंथालयामध्ये दररोज कार्यक्रम होणार आहेत.
वाचन पंधरवड्यानिमित्त सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले जाईल. यानिमित्त विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी मोहीम राबविली जाईल. शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे .
******
माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. २५ :
देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सुशासन दिनही साजरा करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*******
24 December, 2024
*जिल्हाधिकारी कार्यालयात ४९५ जणांची आरोग्य तपासणी* जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला शिबिराचा लाभ
हिंगोली, दि. 24 (जिमाका): केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’च्या पहिला टप्प्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह 495 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य यंत्रणेने ही तपासणी केली असून, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे विशेष तपासणी शिबीर घेण्यात आले. ‘देश का प्रकृती परीक्षण अभियाना’चा पहिला टप्पा हा 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 2024 दरम्यान राबविण्यात आला असून, या शिबिरात 495 अधिकारी-कर्मचारी व रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून माहिती अॅपद्वारे नोंदविण्यात आली.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘देश का प्रकृती परीक्षण अभियान’ राबविण्यात आले. या अभियानामध्ये आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी (आयुष, आरबीएसके), आंतरवासीय वैद्यकीय अधिकारी, हिंगोली व आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापक आणि वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची आरोग्य तपासणी डॉ. विद्या देवकते, डॉ. सोनी अग्रवाल, डॉ. रक्षिता शिंदे, डॉ. पृथ्वी सातपुते, डॉ. पंकज ढाले, संतोष वानखेडे, गौरव पत्रे व रोहिणी साठे यांनी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोपाल कदम व निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आयुष विभागातील डॉ. दीपक मोरे, डॉ. महेश पंचलिंगे, डॉ. संजय नळगीरे व कर्मचारी संतोष वानखेडे, सुनिल जाधव, श्रीमती रेखा टेकाळे यांनी परिश्रम घेतले.
*****
सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक प्रक्रिया यशस्वी -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली, (जिमाका) दि. 24 : आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता आली. त्यासाठी हा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्य गौरव सोहळ्याचे महावीर भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि मंजुषा मुथा उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, यंत्रणेतील सर्व पथक प्रमुख आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वेळी निवडणुकीचे कामकाज पार पाडत असतात. मात्र आता कालानुरूप प्रत्येक निवडणुकीत नवनवे बदल होत असून, राष्ट्रीय कर्तव्याची ही जबाबदारी पार पाडणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीने काम करावे लागते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या पहिल्या बैठकीची आठवण सांगत आणि नंतर झालेल्या अमूलाग्र बदलामुळे त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. देशभरात एकाच वेळी सगळीकडे निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. ती आपण अत्यंत कमी वेळात प्रभावीपणे पार पाडतो, हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत निवडणूक यंत्रणेत काम करणारे अधिकारी, कर्मचारी आदि सर्वांचे योगदान आहे. पथकप्रमुखापासून ते मतदान यंत्रणेची वाहतूक करणाऱ्या हमालांचेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कौतुक केले. एसएसटी आणि एफएसटीचे कौतुक करताना व्हिडीओग्राफरचा आवर्जून उल्लेख केला. निवडणूक काळात विविध साहित्यसामुग्रीचे पुरवठादार, मतदानाच्या दिवशी कार्यरत मतदान कार्यात सहभागी पथकातील अधिकारी -कर्मचारी यांचाही विशेषत्वाने उल्लेख केला. यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ही आव्हानात्मक, संवेदनशील निवडणूक होती. तरीही सामूहिक प्रयत्नातून ती यशस्वीरित्या पार पाडली, त्याबद्दल सर्वांचे कौतुक करत प्रत्येक कार्य हे नाविन्यापूर्ण होते. त्यामुळे आपण सर्वांनी आपले अनुभव लिखित स्वरुपात मांडावेत. जेणेकरून आपल्याला आणि निवडणूक विभागाला मार्गदर्शक सूचना म्हणून कामी येतील, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. तरीही विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यात यंत्रणेला यश मिळाले. तसेच पोलीस यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही टपाली मतदान मोठ्या प्रमाणावर करून घेण्यात यश मिळाले. जिल्ह्यात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे आणि प्रतीक्षा भुते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सर्व पथक प्रमुख आणि त्यांच्या चमूचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कोकरे यांनी केले, तर आभार एकात्मिक महिला व बालविकास विभाग (नागरी प्रकल्प) चे बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल चव्हाण यांनी मानले.
******
23 December, 2024
निपुण हिंगोली कार्यक्रमांतर्गत पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी यांची भेट
हिंगोली (जिमाका), दि. 23 : हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मराठी इंग्रजी व गणित विषयातील पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी निपुण हिंगोली हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दि. 20 डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन संवाद साधला.
या कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी इयत्ता 2 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती करण्यात आली होती. वर्गात वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थी असतात आणि त्यांना स्तरानुसार अध्यापन करणे गरजेचे आहे. म्हणून निपुण हिंगोली हा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शिक्षकांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
शिक्षकांचे शाळेवरील अनुपस्थिती बाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना त्यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला. या शाळेतील इयत्ता चौथी विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निहाय पडताळणी केली. मुलांच्या शिकण्यामध्ये फारसा फरक दिसून आला नाही. तेव्हा शिक्षकांना विचारणा केली असता त्यांनी स्तरानुसार कृती कार्यक्रम तयार केलेला नव्हता. तसेच विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर नेण्यासाठी कोणकोणत्या कृती कराव्यात, हे सांगता आले नाही. मात्र या उलट इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चितीच्या अनुषंगाने पडताळणी केली असता समाधान व्यक्त केले. या वर्गाच्या शिक्षिकेच्या प्रगतीचे कौतुकही केले.
विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा करताना यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचाही आढावा घेतला. वारंवार पालक भेटी घेऊन, सभा घेऊन विद्यार्थी उपस्थितीसाठी शिक्षकांने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी पेडगाव शाळेच्या मुख्याध्यापकांनी जानेवारी 2025 अखेरपर्यंत सर्व विद्यार्थी अंतिम स्तरावर पोचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
******
जिल्ह्याच्या विकासासाठी उद्देशनिश्चिती व योग्य नियोजनातून कामाला लागा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्याच्या विकासासाठी उद्देश निश्चिती व योग्य नियोजन करत कामाला लागावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बैठकीत दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सुशासन सप्ताहानिमित्त कार्यशाळा, जिल्हा कृती आराखडा व लोकसेवा हक्क कायद्याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, राज्यातील मोठ्या शहरांना वाढण्याच्या संधी आता संपत आल्या असून, भविष्यात छोट्या शहरांना विकासात्मक संधी मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. आपापल्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात, खात्यांमध्ये भविष्यात 2047 पर्यंत विकासात्मक नियोजन करावे. आपल्या अचूक नियोजनातून विकासकामे करण्यासाठी संधी शोधाव्यात. जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात वृद्धी करण्यासाठी मोठ्या पर्यटन क्षेत्राचे अध्ययन करून तसा जिल्ह्याचा 2047 पर्यंत विकासात्मक उद्देश ठेवावा. जिल्ह्याचे 2047 पर्यंत तिप्पट उत्पन करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले असून, त्याप्रमाणे नियोजन आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या विभागांनी तुती लागवड, रेशीम, मत्स्यशेती, पारंपरिक पिक पद्धतींऐवजी मिश्रशेती, जोडधंद्यांवर भर देणे आवश्यक आहे. राज्याच्या वनाच्छादनाच्या तुलनेत जिल्हा मागास असून, वनाच्छादित क्षेत्रात वृद्धी करण्यासाठी येथे मोठी संधी आहे. पर्यटन, उद्योग व्यवसाय वाढावा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्याजवळून जात असल्यामुळे दुग्धव्यवसायात वृद्धी करणे, फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होणे, मिश्र आणि पिकपद्धतीतील वैविध्य, चारा उत्पन्नात वाढ व्हावी, निर्मितीखर्च कपात करणे, लघुउद्योगनिर्मिती, चाऱ्याच्या नवनवीन जाती संशोधन करणे, जिल्ह्याला भौगोलिकदृष्ट्या समृद्धी मोठी असल्यामुळे जलसंधारण, सिंचनातून समृद्धी आणण्यासाठी अनुकूल रचना आहे. त्यामुळे कृषिसिंचनातून कृषि, मत्स्य, हळद, ऊस आदि पिकांसह ड्रगन फ्रूट, पशुधनवाढीवर लक्ष केंद्रीत करावे.
बचत गटांनाही विकसित भारत संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. परस्परपूरक असणारे उद्योग वाढवणे, क्लस्टर डेव्हलप करणे, रेशीम शेती, सोयाबीन, डाळ निर्मिती कारखाने वाढवणे, विविध क्षेत्रासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणातून उपलब्ध करून द्यावेत. आरोग्य यंत्रणेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्यासाठी तशा प्रशिक्षण संस्था निर्मिती करणे, भविष्यात लागणाऱ्या रोजगाराच्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवनवे ट्रेड्स येणार असून, त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर जिल्ह्यात भर देण्यात यावा, असे सांगून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पंचवार्षिक नियोजनात औद्योगिक विकास महामंडळ, पर्यटन, कृषि, उद्योग, पशुसंवर्धन विभाग, इको-टुरिजम, रस्ते बांधणी, सौरशक्तीचा वाढता वापर पाहता त्या साहित्याची दुरुस्ती, बांधणी, लिगो, सायन्स, मँग्नेट पर्यटन आदी विकास कामे करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या.
यावेळी सुशासन सप्ताहानिमित्त शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या 'निपुण हिंगोली' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करून दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत त्यांचे अध्ययन स्तर उच्चतम करण्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पोषण माह, कुपोषण निर्मूलन यासह राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.
*लोकसेवा हक्क कायद्याचा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण*
लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, वार्षिक अहवाल तयार करणे यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी लॉग इन आयडी व अहवाल कसे तयार करावे, याबाबतचे प्रात्यक्षिक लोकसवा हक्क अधिनियमाचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी प्रात्यक्षिकद्वारे माहिती दिली.
सुशासन सप्ताह कार्यशाळेचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी केले तर लोकसेवा हक्क कायदा प्रशिक्षणाबाबतचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले. शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
******
20 December, 2024
परदेश शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 20 : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर, पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, पारशी, ज्यू, शीख या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
या योजनेसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी दि. 31 डिसेंबर, 2024 पर्यंत आयुक्त, समाज कल्याण, 3 चर्च पथ रोड, महाराष्ट्र राज्य, पुणे-01 येथे अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
******
महेश टापरे हिंगोली जिल्ह्यातील पहिला लेफ्टनंट जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाला सन्मान
हिंगोली (जिमाका), दि. 20 : शहरातील सिताराम नगरीत वास्तव्यास असलेले तथा मूळचे पांगरी गावाचे रहिवाशी कडूजी टापरे (माजी सैनिक) यांचा मुलगा महेश टापरे याने पहिल्याच प्रयत्नात एनडीए आणि आयआयटी परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. काही दिवसातच महेश हा सैन्य दलातील लेफ्टनंट या पदावर रुजू होणार आहे. त्याच्या या यशामुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी महेशचे वडील माजी सैनिक नाईक कडूजी टापरे, मामा आनंद साळवे, जिल्हा सैनिकी कार्यालयातील कॅप्टन मुकाडे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जांबुटकर, सहसचिव पंडीत हाके आदी माजी सैनिक उपस्थित होते.
महेशचे वडील हे माजी सैनिक असल्याने महेशला लहानपणापासूनच सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्याने सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी एनडीए परीक्षा देण्याचे ठरविले. केवळ दोन महिन्यात त्याने एनडीएची तयारी केली. उच्च काठिण्य पातळी असलेल्या 10 परीक्षांमध्ये एनडीए येत असल्याने त्याला यश मिळवणे एवढे सोपे नव्हते. त्याने कुठलेही क्लास न लावता घरीच अभ्यास करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ही परीक्षा तसेच पाच दिवासाच्या मुलाखतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. महेशकडे आपले करिअर घडविण्यासाठी आय.आय.टी. व एन.डी.ए. अशा दोन सुवर्णसंधी असताना त्याने सैन्य दलात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ठरविले. एनडीए परीक्षेतून अधिकारी होणारा महेश हा हिंगोली जिल्ह्यातील पहिलाच अधिकारी आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महेशचे वय अवघे 18 वर्षे असून, त्याचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय, दिल्ली आणि अहमदाबाद येथे व माध्यमिक शिक्षण विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल येथे पूर्ण झाले आहे. त्याने नुकतीच आदर्श महाविद्यालय येथून मार्च-2024 मध्ये 12 वी ची परीक्षा 85 टक्के घेऊन उत्तीर्ण केली होती. त्यांनी मागील एक वर्षापासून घरीच जेईई, आयआयटी करिता ऑनलाईन क्लास लावले होते आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची काठिण्य पातळी असलेली जेईई मेन्समध्ये व जेईई ॲडव्हॉन्स परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्याला आयआयटी गोवा येथे प्रवेशही मिळाला आहे.
*****
सुशासन सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम, शासनाच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवर
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यात 24 डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना 'प्रशासन गाव की ओर' उपक्रमात तहसील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहचविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सर्व समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहीम, उपक्रमाचे शिबिरे आयोजित करून त्या दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.
त्याअनुषंगाने सुशासन सप्ताहानिमित्त आज जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुशासन सप्ताहानिमित्त आज सेनगाव तालुक्यातील गणेशपूर येथे हरभरा पिकांची शेतीशाळा, जोडतळा व खानापूर येथे कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी मार्गदर्शन, वाघजळी येथे कृषी विभागाच्या भाऊसाहेब फुंडकर, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड, गांडूळ खत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री किसान योजना अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
यावेळी गणेशपूर येथे कृषी सहायक श्री. हरणे, गावातील सरपंच व इतर नागरिक उपस्थित होते. जोडतळा येथे कृषी पर्यवेक्षक श्री. राठोड, कृषी सहाय्यक बी. यु. इंगोले, विजय पवार, बी. एस. काळे, एस. एम. इंगळे व समस्त शेतकरी उपस्थित होते. खानापूर येथे मंडळ कृषी अधिकारी, सर्व कृषी सहायक तसेच पीएमएफएमई योजनेचे अधिकारी यांनी शेतकरी व महिला बचत गटांना मार्गदर्शन केले. वाघजळी कृषी सहायक उपस्थित होते.
कळमनुरी तहसील कार्यालयात सुशासन सप्ताहानिमित्त आज पुरवठा विभागामार्फत अपंग, दिव्यांग यांना अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तसेच संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना या विभागामार्फत लाभार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करण्यात आली. तसेच सर्व कर्मचारी यांनी नागरिकांची सनद याचे वाचन केले. कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी, प्र.तहसिलदार, नायब तहसीलदार (पुरवठा), नायब तहसीलदार (संगायो) उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाच्या वतीने समाज कल्याण मुलींचे वस्तीगृह येथे शासकीय योजनांची महिती देण्यात आली. तसेच जटाळवाडी व मसोड, जवळा बाजार येथे शेळ्यांची जंत निर्मूलन मोहिम राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.शिवाजी बुचाले, पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) डॉ. आदित्य पारवेकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. अंतिका पालिमकर उपस्थित होते.
वसमत तालुक्यातील टाकळगाव ग्रामपंचायत कार्यालयात आज सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला व ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली.
*******
सुशासन सप्ताहानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन, खंडेराव सरनाईक यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन
हिंगोली, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात 24 डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आज जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
या ग्रंथप्रदर्शनात विशेषत: नवीन पिढीला व जनतेला ग्रंथाच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते.
यावेळी उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, मिलिंद सोनकांबळे, शंभूनाथ दुभळकर, दिंगबर झुंजारे, फारुक शेख व विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सुशासन सप्ताहानिमित्त विशेष वाचक सभासद नोंदणी मोहीम सुरु करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रंथप्रेमी, वाचकांनी मोठ्या प्रमाणात सभासद होऊन सहभाग नोंदवावा व वाचनाचा आनंद घ्यावा. यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली (सपंर्क क्र. 9403067267) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
हे ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका, हिंगोली येथे येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
******
19 December, 2024
महावितरण कार्यालयात नागरिकाची सनदचे वाचन
हिंगोली, दि. 19 (जिमाका) : ग्राहकांना स्पर्धात्मक किंमती विश्वसनीय आणि दर्जेदार सेवा देऊन भारतातील सर्वोत्तम विज वितरण उपयुक्त बनने आणि राज्याच्या आणि राष्ट्राच्या शाश्वत विकासात योगदान करण्यासाठी महावितरण कंपनीच्या हिंगोली मंडळ कार्यालयात नागरिकाची सनद कार्यक्रम आयोजित केला होता.
सुशासन सप्ताहानिमित्त प्रशासन गॉव की ओर या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अधीक्षक अभियंता राजेशसिंग माधोसिंग चव्हाण यांनी नागरिकाची सनद अधिकारी व कर्मचारी यांना वाचून उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावेळी मंडळ कार्यालयातील कार्यकारी अभियंता सुरेंद्र मुंगारे, कार्यकारी अभियंता अमोल मोरे, व्यवस्थापक (विवले) रमेशकुमार सोनवणे, प्रभारी व्यवस्थापक (मासं) देविदास लांडगे, उपकार्यकारी अभियंता अतुल पेटकर तसेच आदी कर्मचारी उपस्थित होते.
******
श्री फाळेश्वर महाराज फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या गोडाऊन बांधकामाची पाहणी
हिंगोली, (जिमाका) दि. 19 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत श्री फाळेश्वर महाराज फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. फाळेगांव ता.जि. हिंगोली या समुदाय आधारीत संस्थेच्या मशिनरी शेड व गोडाऊन बांधकामाची तसेच नाफेड अंतर्गत खरेदी विक्री केंद्राची आज जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा जिल्हा अंमलबजावणी स्मार्टचे प्रमुख तथा आत्माचे संचालक राजेंद्र कदम यांनी पाहणी करुन मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी जी. बी. बंटेवाड, व संबंधित समुदाय आधारीत संस्थेचे संचालक मारोती वैद्य उपस्थित होते.
******
नैसर्गिक शेतीची आवड असणाऱ्या गावातील सरपंचांनी कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा
हिंगोली, (जिमाका) दि. 19 : तोंडापूर कृषि विज्ञान केंद्रांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषि अभियानांतर्गत 50 हेक्टर क्षेत्रावर एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
कळमनुरी तालुक्यातील नैसर्गिक शेतीची आवड असणाऱ्या गावातील सरपंचांनी कृषि विज्ञान केंद्राशी 9765390976 आणि 7588153193 या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपक्रमात सहभागी होऊ शकणाऱ्या 50 शेतकऱ्यांची (मोबाईल क्रमांकासह) ग्रामपंचायतीचा ठराव व यादी सादर करावी. नैसर्गिक शेतीची क्षमता पाहून त्यांच्या गावाची निवड केली जाईल. तसेच यादीत प्रथम येणाऱ्या गावांना प्राधान्य दिले जाईल. मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे यादी निश्चित करून प्रसिद्ध केली जाईल, असे तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
*****
नागरिकांची सनद वाचनाने सुशासन सप्ताहास जिल्ह्यात प्रारंभ
* सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी आज शिबिराचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात आजपासून सुशासन सप्ताहास प्रारंभ झाला असून, तो 19 ते 24 डिसेंबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना 'प्रशासन गाव की ओर' उपक्रमात तहसील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहचविण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने सर्व विभागप्रमुखांना समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहीम, उपक्रम, महसूल अदालत आदी शिबिरांचे आयोजन करून त्या दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नुकतेच दिले आहेत.
त्याअनुषंगाने आज जिल्ह्यात विविध कार्यालयातर्फे नागरिकांची सनद वाचनाने सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयात ई-ऑफिस प्रशिक्षण व नागरिकांच्या सनदेचे वाचन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा व्यवसाय व शिक्षण अधिकारी कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, महावितरण, जिल्हा परिषद कृषि विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र हट्टा, आखाडा बाळापूर, डोंगरकडा व विभागीय वन अधिकारी कार्यालय यासह विविध कार्यालयात नागरिकांच्या सनदेचे वाचन करण्यात आले.
सुशासन सप्ताहानिमित्त आज औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे केळी येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा यांच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच जैविक निविष्ठा वाटप कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा रेशीम कार्यालयातर्फै सवना ता. सेनगाव येथे तुती लागवड योजनांची माहिती दिली.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सुशासन सप्ताहानिमित्त आज सेनगाव तालुक्यातील मौजे भानखेडा येथे विभागीय सल्लागार केशव पवार, जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप, प्रकल्प समन्वयक गजानन खिरोडकर यांच्याकडून महिला बचत गटांना तेजश्री व नव तेजस्विनी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
तसेच उद्या दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
******
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
हिंगोली, (जिमाका) दि. 19 : राज्य शासनामार्फत यावर्षी मोठ्या प्रमाणात परीक्षा घेतल्या जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रस्तावित परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन निश्चित करण्यात आले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
नव्या वर्षात 5 जानेवारी रोजी महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पुर्वपरीक्षा होणार आहे. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक या पदांचा समावेश आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, बेलिफ व लिपीक टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदांचा यामध्ये समावेश आहे. 16 मार्च रोजी दिवाणी न्यायाधीश व कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी या पदासाठीची पूर्वपरीक्षा आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा नुकतीच झाली असून 26 एप्रिल रोजी 35 संवर्गातील मुख्य परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 10 मे, 2025, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 18 मे, 2025, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 18 मे, 2025 समावेश आहे.
तसेच दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असलेल्या परीक्षामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर, 2025, राज्यसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आदिंचा समावेश आहे. याशिवाय यावर्षेभरात झालेल्या पुर्व परीक्षांच्या सर्व मुख्य परीक्षा या वर्षेभरात होणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविले आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबतची अधिकची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
******
गोशाळा योजनेसाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
हिंगोली, (जिमाका) दि. 19 : राज्यात देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी व त्यासाठी कार्यरत संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता सन 2024-2025 पासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत असलेल्या गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गोवंशासाठी प्रति दिन प्रति गोवंश 50 रुपये अनुदान देण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील नमूद अनुदान पात्रता अटींच्या अधीन राहून हिंगोली जिल्ह्यातील गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळामधील देश गोवंश संख्या 50 पेक्षा जास्त असलेल्या गोशाळांनी या योजनेसाठी दि. 31 डिसेंबरपर्यंत www.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.
प्राप्त अर्जाची तपासणी गौसेवा आयोगामार्फत दि. 1 जानेवारी ते 10 जानेवारी, 2025 या कालावधी करण्यात येणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी समितीद्वारे प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी दि. 11 जानेवारी ते 20 जानेवारी, 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे. जिल्हा गोशाळा पडताळणी अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनाची संख्या दि. 21 जानेवारी ते 25 जानेवारी, 2025 या कालावधीत आयोग कार्यालयास कळविण्यात येणार आहे.
शासन निर्णयातील नमूद सर्व अटींचे पालन करुन उपरोक्त वेळापत्रकानुसार हिंगोली जिल्ह्यातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत असलेल्या जास्तीत जास्त गोशाळांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , हिंगोली यांनी केले आहे.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , हिंगोली यांनी केले आहे.
******
प्रशासन गांव की ओर सप्ताहांतर्गत कृषि विभागातर्फे चर्चासत्र व कार्यशाळा
हिंगोली, (जिमाका) दि. 19 : सुशासन सप्ताहांतर्गत प्रशासन गांव की ओर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषि विभागातर्फे हिंगोली तालुक्यात यानिमित्त बुधवार (दि.18) रोजी मासिक चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या मासिक चर्चासत्रात मौजे डिग्रस क., दाटेगाव, सवड, देऊळगाव रा. , राहोली बु. आदी गावांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषि अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषि अधिकारी गोविंद काळे, सुनिल भिसे, कुंभार, मंडळ कृषि अधिकारी कमलाकर सांगळे, बालाजी गाडगे, अनंत मुळे, लिंबाळकर, नितीन घुगे, अमित सोळंके, मनोज लोखंडे, संघई, मराठवाडा कृषि विभागाचे शास्त्रज्ञ गजानन गडदे, मधुकर मांडगे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव, अनिल कोळंबे, तंत्र अधिकारी अनिता राहणे यांनी भेट देऊन हरभरा, तूर, करडई या रब्बी हंगामातील पारंपारिक पिकास मल्चींगवरील टरबूज व खरबूज पिकांची तसेच फळधारणा झालेल्या संत्रा फळबागांची पाहणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच राहोली बु. येथील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत अनुसया राऊत यांनी स्थापन केलेल्या स्वानंद लाकडी तेलघाना उद्योगास भेट देण्यात आली.
क्षेत्रीय भेटीनंतर हिंगोली तालुक्यातील देऊळगाव रामा येथे उपस्थित शास्त्रज्ञांनी सद्यस्थितीतील पिक परिस्थितीबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक अरुण पडघन, शंकर कोटे, कृषी सहाय्यक विलास गिरी, शुभांगी वाळुंज, दामोदर रोडगे यांनी विशेष प्रयत्न केले.
******
18 December, 2024
आजपासून सुशासन सप्ताहाला प्रारंभ
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रशासन गावपातळीवर
हिंगोली, (जिमाका) दि.१८ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसंदर्भात सामान्य नागरिकांना माहिती व्हावी तसेच यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन विभागामार्फत उद्यापासून सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत यासंदर्भात देण्यात आलेल्या निर्देशानुसार 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत सर्व कार्यालयाने सुशासन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, त्यांना सुलभ सेवा पुरविणे, जिल्हा, उपविभाग, तहसील स्तरावरील योजनांची कालबद्ध अंमलबजावणी करणे. याबाबत शिबीर आयोजित करण्याचे केंद्रीय विभागाने सुचविले असून जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, आपले सरकारसह विविध पोर्टलवर प्राप्त तक्रारीचे निराकरण, ऑनलाईन देण्यात येणाऱ्या सेवांचा वेळेत निपटारा करणे, सेवा देण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा जास्तीत-जास्त वापर करणे आदी निर्देश देण्यात आले आहेत.
त्यामुळे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात आयोजित विविध शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
*****
अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : संयुक्त राज्य संघटनेने 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तृत केला होता. त्याकरिता दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तसेच अल्पसंख्यांक समाजास त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती व्हावी यासाठी अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी देखील 18 डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ म्हणून आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, सहायक सांख्यिकी अधिकारी अ. अ. करेवार, वसमत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.एन. कोंडावार, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक, प्रकाश सोनी, वंदना सोईतकर, सिद्दीकी अहमद, सय्यद मीर, मौलाना सिद्दीकी मोबीन, माध्यम प्रतिनिधी आय. डी. पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहभागी वक्त्यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासनाने तयार केलेल्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमाचा वापर करुन प्रशासनाने तसेच अल्पसंख्याक समुदायातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमावी. तसेच अल्पसंख्याकांनी आपले अधिकार जाणून आपला विकास व देशाप्रती कर्तव्य पुर्ण करावेत, असे मत मांडले.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. चितळे यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्व सांगून अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती प्रास्ताविकातून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव देशमुख यांनी केते, तर आभार प्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे यांनी केले.
******
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन
• कार्यशाळेत दिली स्टँड अप योजनेची माहिती
• महाज्योती संस्थेमार्फत लाभार्थ्यांना टॅबचे वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 18 : येथील सामाजिक न्याय भवनामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मार्जिनमनी-स्टँडअप इंडिया योजनेअतंर्गत अनुसूचित जातीच्या नवउद्योजकांसाठी मेळावा, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कार्यशाळा तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या संस्थेमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षण घेणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी अभियोक्ता संतोष कुटे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपप्रबंधक अजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक मदन पवार, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक समितीचे अशासकीय सदस्य जयाजी पाईकराव, भास्कर वाठोरे, संजय काळे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जाणीव जागृती होण्यासाठी व जातीय सलोखा वृद्धिंगत होण्यासाठी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांनी बार्टी या संस्थेमार्फत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करण्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी या कायद्यांतर्गत असलेली सुरक्षा व मिळणारे लाभ याबाबत जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा सरकारी अभियोक्ता संतोष कुटे यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा त्या समाजातील नागरिकांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी हा कायदा समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक मदन पवार यांनी घडलेल्या उदाहरणासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली.
अशासकीय सदस्य जयाजी पाईकराव यांनी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा उपयोग करुन पीडित कुटुंबाचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यांना शासनाकडून मिळणारे आर्थिक लाभ, घरकुल यासारखे लाभ मिळवून देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
स्टेट बँक इंडिया बँकेचे उपप्रबंधक अजय गायकवाड यांनी स्टँडअप योजनेतून कोणकोणते उद्योग उभारता येतात. त्यासाठी लागणारे कर्ज घेण्यासाठी कोठे अर्ज करावे, लागणारी कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले. तर सूत्रसंचालन बार्टीचे समतादूत सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी 300 ते 350 नवउद्योजकांना मार्गदर्शन व 60 लाभार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
*****
17 December, 2024
लिंग आधारित हिंसाचारापासून दूर करण्यासाठी जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने हिंगाली शहरातील विनर्स कोचींग क्लासेस व निवासी वस्तीगृह येथे चाईल्ड हेल्प लाईन 1098 कडून लिंग आधारीत हिंसाचारापासून दूर करण्यासाठी नुकतीच जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण, पोक्सो कायदा पीडित भरपाईवर लक्ष केंद्रीत करणे, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श ओळखणे, निरोगी नाते संबधांना प्रोत्साहन देणे, महिला आणि मुलींच्या प्रतिष्ठेचा आदर राखणे यासारख्या विषयावर चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी माहिती दिली. त्याचबरोबर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006, बालविवाहाचे योग्य वय कोणते, कारणे व त्याचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्व याबाबतची माहिती चाईल्ड हेल्प लाईनचे समुपदेशक अंकुर पाटोडे यांनी दिली. बालकांचे हक्क, अधिकार, कर्तव्य व जबाबदारी तसेच बालकांना शिक्षणाचे महत्व, बालक म्हणजे काय, बालकाने बाल वयात स्वतःची काळजी घेण्याबाबतची माहिती केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी दिली. चाईल्ड हेल्प लाईन 1098 च्या सुपरवायजर श्रीमती धम्मप्रिया पखाले यांनी काळजी व संरक्षणाच्या दृष्टीकोनातून सदर बालकांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी किंवा मदत मागवण्यासाठी व चाईल्ड हेल्प लाईन 1098 बाबत माहिती दिली. तसेच चाईल्ड हेल्प लाईनचे पर्यवेक्षक श्रीकांत वाघमारे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेबाबत माहिती दिली.
यावेळी विनर्स कोचींग क्लासेसचे संचालक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
******
"अल्पसंख्याक हक्क दिवस" बुधवारी कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्ताने अल्पसंख्यांकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव किंवा माहिती करून दिली जाणार आहे. त्याअनुषंगाने बुधवार 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सायंकाळी 4 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने दि. 18 डिसेंबर, 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तुत केला आहे. त्यानुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावी यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येकवर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्हा प्रशासनाच्यावतीने “अल्पसंख्याक हक्क दिवस" म्हणून राबविण्यात येतो.
अल्पसंख्याक विकास विभाग परिपत्रक क्र. अविवि' 2022/प्र.क्र.51/का-8 दि.16 डिसेंबर, 2024 नुसार अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव / माहिती देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे सूचना प्राप्त आहेत.
******
जलजीवन मिशनची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' योजनेची अपूर्ण कामे शासनाच्या उद्दिष्टानुसार मार्च 2025 पर्यंत पूर्ण करुन ग्रामीण भागातील नागरिकांना 55 लीटर दरडोई दररोज शुध्द व शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा दि. 14 डिसेंबर रोजी आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वॅपकॉस अंमलबजावणी संस्था, टाटा त्रयस्थ तांत्रिक तपासणी यंत्रणा इत्यादी विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल पुढे म्हणाले, नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा योग्य दर्जा राखण्यासाठी त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्था प्रतिनिधी यांनी कामे प्रगतीपथावर असताना वेळोवेळी भेटी देऊन दर्जा तपासणी करावी. त्यासाठी अंमलबजावणी संस्था व सर्व शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय साधून प्रभावीपणे तपासण्या करुन घेण्याचे निर्देश दिले. नळ पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली आहेत, परंतु विद्युत जोडणी अभावी योजना कार्यान्वित झाली नसल्यास त्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. ज्या गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचा उद्भव विहिरीला पाणी लागले नाही, अशा गावांच्या नवीन स्त्रोतांसाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत तात्काळ सर्वेक्षण करुन नवीन स्त्रोत उपलब्ध करुन घ्यावेत. जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल से जल' योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन केले. जागेअभावी रखडलेल्या योजनांना जिल्हा परिषदेने तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी. आवश्यक असलेल्या गावाची सुधारित अंदाजपत्रके तयार करुन शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने त्यांच्याकडील कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
******
16 December, 2024
जिल्हा वार्षिक योजनेची कामे सर्व यंत्रणानी तातडीने पूर्ण करावीत -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हा वार्षिक योजनेचा मंजूर निधी विविध विकास कामांवर खर्च करुन नियोजित कामे संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज दिले.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्यासह संबंधित विभागाच्या विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. गोयल पुढे म्हणाले, संबंधित यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही तात्काळ पूर्ण करुन विकास कामे सुरु करावीत. मंजूर झालेली सर्व कामे तातडीने देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सन 2025-26 चा आराखडा प्रारुप आराखडा आयपास प्रणालीवर भरुन सादर करण्याच्या सूचना केल्या. मंजूर संपूर्ण निधीचा विनीयोग करुन निधी परत जाता कामा नये, याची खबरदारी घ्यावी. तसेच मागील वर्षीची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
******
सुशासन सप्ताहा'त शासनाच्या लोकाभिमुख योजना गावपातळीवर पोहचवा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबरदरम्यान सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना 'प्रशासन गाव की ओर' उपक्रमात तहसील आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायत पातळीवर पोहचविण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी समाजातील विविध घटकातील नागरिकांच्या अडचणी, तक्रारी विशेष मोहीम, उपक्रम, महसूल अदालत आदि शिबिरांचे आयोजन करून त्या दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.
सुशासन सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विभागप्रमुखांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
सर्व विभागांनी 19 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान सुशासन सप्ताहात शासनाच्या सर्वच योजना गावपातळीवर प्रभावीपणे राबवाव्यात. तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी प्रशासनातील सर्व विभागप्रमुखांशी योग्य समन्वय राखून 'प्रशासन गॉव की ओर' या उपक्रमांतर्गंत नवनवीन संकल्पना राबवाव्यात.
सर्व कार्यालय प्रमुखांनी 19 डिसेंबर रोजी नागरिकांची सनदीचे वाचन करायचे आहेत. दि. 20 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांनी सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन करावेत. दि. 21 रोजीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावकऱ्यांना द्यावी. दि. 22 रोजी अँग्री स्टँक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिराचे आयोजन करावे. दि. 23 रोजी शहर व ग्रामीण आवास योजनेची माहिती द्यावी. दि. 24 रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाने त्या विभागाच्या योजनांची शिबिरांच्या माध्यमातून माहिती द्यावी. नागरिकांची प्रलंबित प्रकरणे, तक्रारी, प्रश्न सोडविण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी दिल्या.
******
15 December, 2024
हिंगोली येथील लोकन्यायालयामध्ये 3 कोटी 33 लाख रुपयांची प्रकरणे निकाली
हिंगोली (जिमाका) , दि. 15 : तालुका विधी सेवा समिती, हिंगोली यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालय मुंबई आणि जिल्हा न्यायालय, परभणी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली न्यायालयामध्ये शनिवारी (दि. 14) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयामध्ये प्रलंबित 1189 प्रकरणे तसेच विद्युत महावितरण कंपनी व विविध बँका यांची वाद दाखलपूर्व 4678 प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.
या लोकअदालतीमध्ये प्रलंबित 95 व वाद दाखलपूर्व 100 प्रकरणे अशी एकूण 195 प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयात प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणात 3 कोटी 33 लाख 24 हजार 503 रुपयांची तडजोडी आधारे रक्कम ठरविण्यात आली व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकन्यायालयासाठी हिंगोली येथील न्यायिक अधिकारी तसेच विधिज्ञ समाविष्ठ असलेले एकूण पाच पॅनल करण्यात आले होते.
या लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष आर. व्ही. लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा न्यायाधीश-1 आर.व्ही. लोखंडे, जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.एन. माने-गाडेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जी.के. नंदनवार,दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर डी.यु. राजपूत, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती. पी. आर. पमनानी यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम केले.
या लोकअदालतीला वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवशंकर वाबळे (उमरेकर), उपाध्यक्ष अॅड.श्री. डी.पी. भाकरे, वकील संघाचे सचिव अॅड. अजय वानखडे, वकील संघाचे सहसचिव अॅड.नवनाथ पारोकर व सर्व सन्माननीय वकील सभासद, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
लोकन्यायालयामुळे मिळाला तात्काळ न्याय पक्षकारास 28 लाखाचा धनादेश सुपूर्द....
या लोकन्यायालयामध्ये गंगासागर संदीप सरकटे, वय 35 वर्षे हिचे पती नामे संदिप मोहन सरकटे ह्यांचा दिनांक 03 जानेवारी, 2023 रोजी हिंगोली ते जवळा-पळशी रोडवर नांदु-याजवळ मोटारसायकलने अपघात झाला होता. या अपघातामध्ये तिचे पती मयत झाल्याने विद्यमान न्यायालय, हिंगोली येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. सदरील दावा 28 लाखांमध्ये तडजोडी अंती निकाली निघाला आहे. या प्रकरणांमध्ये लोकन्यायालयामुळे एका वर्षाच्या आत पक्षकाराला न्याय मिळाला आहे व लोकअदालतच्या दिवशीच तात्काळ कंपनीतर्फे पक्षकारांना सदरील रकमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. सदरील धनादेश पॅनल प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश-1 राजेंद्र वि. लोखंडे व पॅनल प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश-2 श्रीमती एस.एन. माने-गाडेकर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
*******
विपश्यनेच्या माध्यमातून आनंदी गावे निर्माण करावीत -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 15 : आनंद ही स्वत:ची अनुभती आहे. ते आपल्या स्वत:लाच तयार करावी लागते. प्रत्येक माणसाचे आनंदाचे स्त्रोत वेगवेगळे आहेत. भूतान हा सर्वांत आनंददायी देश आहे. आनंद निर्माण करण्याचे प्रकल्प विपश्यना आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी तणाव व विकार, व्यसनापासून मुक्ती मिळविण्यासाठी विपश्यना हे अत्यंत महत्वाचे साधन असून या माध्यमातून आपल्या गावात दररोज ध्यान शिबिरे घेऊन आपले गाव आनंदी गाव निर्माण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी चिंचोली येथील नागरिकांना केले.
हिंगोली तालुक्यातील चिंचोली (महादेव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंदी गाव उपक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, आश्विनकुमार माने, गटविकास अधिकारी डी. आय. गायकवाड, विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे, विपश्यना वरिष्ठ सहाय आचार्य डॉ. श्रीराम राठोड, विपश्यना सहायक आचार्य शरद चालीकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आनंदी गाव उपक्रमांची संकल्पना व त्याचे महत्व याविषयीची माहिती प्रास्ताविकात दिली.
यावेळी विपश्यना आचार्य डॉ. संग्राम जोंधळे यांनी सुखशांतीचे जीवन जगण्यासाठी व अंतरमनातून आनंद मिळण्यासाठी विपश्यना आवश्यक असल्याचे सांगून आनंदी गाव उपक्रमाची सुरुवात परभणी जिल्ह्यातील कावलगाव (ता. पुर्णा) या गावातून झाली असल्याचे सांगितले. आचार्य डॉ. श्रीराम राठोड यांनी आनपान ही ध्यान साधना विद्यार्थ्यांसाठी अतिशय लाभदायी असल्याचे सांगितले. तर शरद चालीकवार यांनी दुखा:वर मात करण्याची ताकद साधनेत असल्याचे सांगून त्यांचे अनुभव कथन केले.
यावेळी आनंदी गाव कावलगाव येथे राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थित नागरिक, विद्यार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी चिंचोली गावचे सरपंच, पोलीस पाटील, विविध पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
Subscribe to:
Posts (Atom)