09 December, 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी संकलनाला प्रारंभ, माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 09 : देशात शांतता व अखंडता टिकवून ठेवण्याचे काम सीमेवरील सैनिकांनी स्वत:च्या शौर्याने, धैर्याने कमीत कमी साधनसामग्रीद्वारे चांगल्या प्रकारे करत आहेत. आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता अविरतपणे सेवा करत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत, असे सांगून माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलन प्रारंभाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिनव गोयल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, माजी सैनिक संघटनेचे सय्यद मीर यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अभिनव गोयल पुढे म्हणाले, विविध क्षेत्रात महिला सहभागी होत आहेत. तर आता सशस्त्र सेना विभागातही त्यांच्या सहभागाचे प्रमाण वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे. या सर्व सैनिकांविषयी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी 28 लक्ष रुपये ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट होते. 39 लक्ष 72 हजार रुपये ध्वजदिन निधी संकलन करुन ध्वजदिन निधी संकलनामध्ये 141 टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वर्षीही राज्यात सर्वाधिक ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करु, असे सांगून जिल्ह्यातील सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी, तक्रारी, गाऱ्हाणी, वेतन व इतर सोयीसुविधांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अनिल माचेवाड यांनी संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या निधीतून माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. हिंगोली जिल्ह्याने यावर्षी 141 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यामुळे पुढील वर्षाचे उद्दिष्ट कालावधीची वाट न पाहता वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मातोश्री गंगादेवी देवडा निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्टत कार्य केलेल्या कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. शहीद सैनिक गणपत भिकाजी रणवीर यांच्या माता-पित्याचा साडीचोळी देवून सत्कार केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर इंगोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुरेश भालेराव यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, प्राचार्य डॉ. व्ही. एस. कनवटे, प्राचार्य डॉ. जे. एस. भोयर, नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर, वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ पाईकराव, कडूजी टिपरे, दलित पाईकराव, बाबूराव जामबुतकर, पंडित हाके, केशव भडंगे, चंदू टिपरे, सुबेदार दत्तराव लेकुळे, नामदेव मस्के, कॅप्टन केशव जाधव, कल्याण संघटक तुकाराम मुकाडे आदींनी विशेष सहकार्य केले. *******

No comments: