10 December, 2024

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी 'निपुण हिंगोली'

हिंगोली, दि.१० (जिमाका): प्रत्येक मुलाकडे प्राथमिक स्तरावर मराठी, इंग्रजी आणि गणित विषय मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी 'निपुण हिंगोली' हा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांनी हाती घेतला आहे. ' निपुण हिंगोली' या उपक्रमांतर्गत मराठी भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाची किमान कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती शाळा स्तरावर शिक्षकांमार्फत करण्यात आली आहे. अध्ययन स्तर निश्चितीनंतर विद्यार्थ्यांना स्तरानुसार अध्यापन करुन पुढील २ महिन्यापर्यंत म्हणजेच दिनांक २६ जानेवारी २०२५ पर्यंत अंतिम स्तरावर विद्यार्थी नेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेने योग्य नियोजन करून जाणीवपूर्वक शाळा भेटी करण्याचे व स्तरानुसार अध्ययन- अध्यापन करण्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात अध्ययन स्तर निश्चितीनुसार विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट करून शिक्षक विद्यार्थ्यांना स्तरानुसार अध्यापन करत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दिसून येत आहे. पर्यवेक्षीय यंत्रणेनेही नियोजनपूर्वक शाळा भेटी करण्यासाठी कंबर कसली आहे. २६ जानेवारी २०२५ पर्यंत भाषा गणित आणि इंग्रजी विषयातील विद्यार्थी अंतिम स्तरावर नेण्यासाठी शिक्षक तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हास्तरावरून केले आहे. या आवाहनाला शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्तरनिहाय मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृती आराखडा तयार करून अध्यापन करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'निपुण हिंगोली' हा उपक्रम नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. तसेच या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढून गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होणार असल्याचे आशादायक चित्र पुढील काळात दिसून येणार आहे. *****

No comments: