03 December, 2024

ॲग्रिस्टॅक ॲपमध्ये आधार लिंक माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे - प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली (जिमाका),दि.03 : भारत एक कृषिप्रधान देश असून, देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषि क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषि क्षेत्राच्या विकासामुळेच शक्य होणार आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता अन्नधान्य उपलब्धता, शेती आणि शेती संलग्न व्यवसाय जोपासणी, कृषि मालास साठवणूक सुविधा, योग्य बाजारपेठ, भाव तसेच कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. राज्यात कृषि क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या 55 टक्के आहे. कृषि क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाव्दारे अनेक महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करुन योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवून कृषि क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे. यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. अॅग्रिस्टॅक हे कृषि क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषि क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषि उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषि-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल. विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थ्यांची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. या अभिलेखांपेकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पध्दतीने अद्ययावत केले जात असल्याने तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिग संस्थेने राज्यातील जमिनीचे भू संदर्भीकरण (जिओ रेफरन्सिंग) करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे. याचा वापर करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन अॅग्रिस्टॅक योजना हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात तालुकास्तरावरील महसूल विभाग, कृषि विभाग, ग्रामविकास विभाग, सहकार विभाग आणि इतर संलग्न विभागाची जिल्हास्तरावरुन व्हीडीओ कॉन्फरन्सींव्दारे नुकतीच प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना माहिती दिली आहे. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम उपस्थित होते. प्र. जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार दि. 16 डिसेंबर, 2024 पासून ग्रामस्तरावर कॅम्प आयोजित करुन मोहिम स्वरुपात ॲग्रिस्टॅक ॲपमध्ये शेतकऱ्यांची आधार लिंक माहिती भरली जाणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःचा आधार लिंक करण्याची आणि अनुषंगिक माहिती भरण्यासाठी संमती देवून आपल्याला मिळणाऱ्या कृषि व इतर विभागाच्या सर्व योजनांचे फायदे घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे, *****

No comments: