13 December, 2024

जिल्ह्यातील 130 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची केली टुडी-इको तपासणी

• संदर्भीत 20 रुग्णांची मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया हिंगोली (जिमाका), दि. 13 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून 0 ते 18 वर्ष वयोगटातील संदर्भीत हृदयरुग्णासाठी नुकतेच जिल्हा सामान्य रुग्णालयात टुडी-इको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 130 संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टुडी-इको तपासणी करण्यात आली. यापैकी शस्त्रक्रियेसाठी 20 विद्यार्थी संदर्भींत करण्यात आले आहेत. संदर्भीत विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पीटल, मुंबई यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत मोफत करण्यात येणार आहेत. ही तपासणी बालाजी हॉस्पीटल, भायखळा, मुंबई येथील तज्ञ डॉ. जयश्री मिश्रा (कार्डियालॉजीस्ट), डॉ. प्रतिक मिश्रा व त्यांच्या चमूमार्फत करण्यात आली. टुडी-इको तपासणी शिबीर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अस्थिव्यंग तज्ञ (वर्ग-1)डॉ. मंगेश टेहरे, अस्थिव्यंग तज्ञ डॉ. मनिष बगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेट्रन चिंचकर, सहायक मेट्रन आशा क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. संतोष नांदूरकर, पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, ज्ञानोबा चव्हाण व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील तसेच डिईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, ए.एन.एम., कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिका इत्यादींनी परिश्रम घेतले. हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या व योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना या आरबीएसके कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हृदयाच्या आजारासंदर्भात वेळोवेळी टुडी-इको तपासणी करावी व वेळेत आजाराचे निदान करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याकडून करण्यात आले आहे. ****

No comments: