23 December, 2024

जिल्ह्याच्या विकासासाठी उद्देशनिश्चिती व योग्य नियोजनातून कामाला लागा - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्याच्या विकासासाठी उद्देश निश्चिती व योग्य नियोजन करत कामाला लागावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बैठकीत दिले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सुशासन सप्ताहानिमित्त कार्यशाळा, जिल्हा कृती आराखडा व लोकसेवा हक्क कायद्याबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, राज्यातील मोठ्या शहरांना वाढण्याच्या संधी आता संपत आल्या असून, भविष्यात छोट्या शहरांना विकासात्मक संधी मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. आपापल्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात, खात्यांमध्ये भविष्यात 2047 पर्यंत विकासात्मक नियोजन करावे. आपल्या अचूक नियोजनातून विकासकामे करण्यासाठी संधी शोधाव्यात. जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात वृद्धी करण्यासाठी मोठ्या पर्यटन क्षेत्राचे अध्ययन करून तसा जिल्ह्याचा 2047 पर्यंत विकासात्मक उद्देश ठेवावा. जिल्ह्याचे 2047 पर्यंत तिप्पट उत्पन करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले असून, त्याप्रमाणे नियोजन आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या विभागांनी तुती लागवड, रेशीम, मत्स्यशेती, पारंपरिक पिक पद्धतींऐवजी मिश्रशेती, जोडधंद्यांवर भर देणे आवश्यक आहे. राज्याच्या वनाच्छादनाच्या तुलनेत जिल्हा मागास असून, वनाच्छादित क्षेत्रात वृद्धी करण्यासाठी येथे मोठी संधी आहे. पर्यटन, उद्योग व्यवसाय वाढावा, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग जिल्ह्याजवळून जात असल्यामुळे दुग्धव्यवसायात वृद्धी करणे, फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होणे, मिश्र आणि पिकपद्धतीतील वैविध्य, चारा उत्पन्नात वाढ व्हावी, निर्मितीखर्च कपात करणे, लघुउद्योगनिर्मिती, चाऱ्याच्या नवनवीन जाती संशोधन करणे, जिल्ह्याला भौगोलिकदृष्ट्या समृद्धी मोठी असल्यामुळे जलसंधारण, सिंचनातून समृद्धी आणण्यासाठी अनुकूल रचना आहे. त्यामुळे कृषिसिंचनातून कृषि, मत्स्य, हळद, ऊस आदि पिकांसह ड्रगन फ्रूट, पशुधनवाढीवर लक्ष केंद्रीत करावे. बचत गटांनाही विकसित भारत संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. परस्परपूरक असणारे उद्योग वाढवणे, क्लस्टर डेव्हलप करणे, रेशीम शेती, सोयाबीन, डाळ निर्मिती कारखाने वाढवणे, विविध क्षेत्रासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्रशिक्षणातून उपलब्ध करून द्यावेत. आरोग्य यंत्रणेसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर देण्यासाठी तशा प्रशिक्षण संस्था निर्मिती करणे, भविष्यात लागणाऱ्या रोजगाराच्या विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवनवे ट्रेड्स येणार असून, त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावर जिल्ह्यात भर देण्यात यावा, असे सांगून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने पंचवार्षिक नियोजनात औद्योगिक विकास महामंडळ, पर्यटन, कृषि, उद्योग, पशुसंवर्धन विभाग, इको-टुरिजम, रस्ते बांधणी, सौरशक्तीचा वाढता वापर पाहता त्या साहित्याची दुरुस्ती, बांधणी, लिगो, सायन्स, मँग्नेट पर्यटन आदी विकास कामे करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. यावेळी सुशासन सप्ताहानिमित्त शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या 'निपुण हिंगोली' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित करून दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत त्यांचे अध्ययन स्तर उच्चतम करण्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला असल्याची माहिती दिली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या पोषण माह, कुपोषण निर्मूलन यासह राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली. *लोकसेवा हक्क कायद्याचा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी दिले प्रशिक्षण* लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, वार्षिक अहवाल तयार करणे यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी लॉग इन आयडी व अहवाल कसे तयार करावे, याबाबतचे प्रात्यक्षिक लोकसवा हक्क अधिनियमाचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी प्रात्यक्षिकद्वारे माहिती दिली. सुशासन सप्ताह कार्यशाळेचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी केले तर लोकसेवा हक्क कायदा प्रशिक्षणाबाबतचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी केले. शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: