24 December, 2024

सर्वांच्या सहकार्यामुळेच निवडणूक प्रक्रिया यशस्वी -- जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडता आली. त्यासाठी हा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यगौरव सोहळ्यात केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्य गौरव सोहळ्याचे महावीर भवन येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड आणि मंजुषा मुथा उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, यंत्रणेतील सर्व पथक प्रमुख आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वेळी निवडणुकीचे कामकाज पार पाडत असतात. मात्र आता कालानुरूप प्रत्येक निवडणुकीत नवनवे बदल होत असून, राष्ट्रीय कर्तव्याची ही जबाबदारी पार पाडणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. त्यामुळे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत जबाबदारीने काम करावे लागते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या पहिल्या बैठकीची आठवण सांगत आणि नंतर झालेल्या अमूलाग्र बदलामुळे त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. देशभरात एकाच वेळी सगळीकडे निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. ती आपण अत्यंत कमी वेळात प्रभावीपणे पार पाडतो, हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत निवडणूक यंत्रणेत काम करणारे अधिकारी, कर्मचारी आदि सर्वांचे योगदान आहे. पथकप्रमुखापासून ते मतदान यंत्रणेची वाहतूक करणाऱ्या हमालांचेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी कौतुक केले. एसएसटी आणि एफएसटीचे कौतुक करताना व्हिडीओग्राफरचा आवर्जून उल्लेख केला. निवडणूक काळात विविध साहित्यसामुग्रीचे पुरवठादार, मतदानाच्या दिवशी कार्यरत मतदान कार्यात सहभागी पथकातील अधिकारी -कर्मचारी यांचाही विशेषत्वाने उल्लेख केला. यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ही आव्हानात्मक, संवेदनशील निवडणूक होती. तरीही सामूहिक प्रयत्नातून ती यशस्वीरित्या पार पाडली, त्याबद्दल सर्वांचे कौतुक करत प्रत्येक कार्य हे नाविन्यापूर्ण होते. त्यामुळे आपण सर्वांनी आपले अनुभव लिखित स्वरुपात मांडावेत. जेणेकरून आपल्याला आणि निवडणूक विभागाला मार्गदर्शक सूचना म्हणून कामी येतील, असेही जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. तरीही विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यात यंत्रणेला यश मिळाले. तसेच पोलीस यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही टपाली मतदान मोठ्या प्रमाणावर करून घेण्यात यश मिळाले. जिल्ह्यात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे आणि प्रतीक्षा भुते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सर्व पथक प्रमुख आणि त्यांच्या चमूचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कोकरे यांनी केले, तर आभार एकात्मिक महिला व बालविकास विभाग (नागरी प्रकल्प) चे बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल चव्हाण यांनी मानले. ******

No comments: