31 December, 2024

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याविषयी जनजागृती

हिंगोली, दि.31 (जिमाका): हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराच्या माध्यमातून जवळा खंदारबन येथे आयोजित शिबिरामध्ये बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईन समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर राजरत्न पाईकराव तसेच हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. श्रीकांत एस. गावंडे, राष्ट्रीय सेवा योजना महिला सह कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एस. पाटील व महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. एन. के. आकमार उपस्थित होते. महिला सबलीकरण व बालविवाह एक समस्या या विषयावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीम. सरस्वती कोरडे यांनी दैनंदिन जिवनात महिला विविध भूमिका पार पाडताना समाजाच्या आधारस्तंभ बनल्या असल्याचे सांगून, सर्व भूमिका अत्यंत कुशलतेने निभावत आहेत. महिला ही आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सबल होत असल्याचे सांगितले. परंतु सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबीत्व यातून स्त्रियांची सुटका करण्यासाठी महिला सबलीकरण काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सक्षम समाजनिर्मितीसाठी बालविवाह, त्याची कारणे, दुष्परिणाम व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीची 18 व मुलाची 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे विवाह बेकायदा ठरतात आणि अशा गुन्ह्यास एक लाख रुपयांचा दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी करीता ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आल्या असून, या समितीचे अध्यक्ष सरपंच आहेत व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका आहेत. या सर्वांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाहीत व याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, बालक म्हणजे काय व बालकांकरीता तात्काळ मदत करणारी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची गोपनीयता राखली जाते. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बालविवाह होणार असल्याबाबतची माहिती मिळताच चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 यावर माहिती द्यावी, अशी माहिती गावकऱ्यांना दिली. विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत सोनटक्के, कु. प्रणाली कांबळे व सर्व स्वयंसेवक, शाळेतील विद्यार्थी, किशोर वयीन मुले-मुली व गावातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते. ******

No comments: