12 December, 2024

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी मोफत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 12 : उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगोली आयोजित, महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष ( मैत्री) व जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 18 दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन दि. 20 डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या मुलाखती दि. 18 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हॉल, कळमनुरी येथे होणार आहेत. यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन निवड करण्यात येणार आहे. नियमितपणे उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या अन्न प्रक्रिया उद्योग, दाल मिल, ऑईल मिल, हळद पावडर, मिरची पावडर, मसाले उद्योग, पापड उद्योग, बेकरी उत्पादन, शेवया उद्योग, वेफर्स, गारमेंट, केस व त्वचा निगा आदी उपलब्ध संधीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासोबतच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास , विविध व्यवसाय संधी, संवाद कौशल्य, शासकीय, निमशासकीय व इतर महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजना, बँकेची भूमिका, प्रकल्प अहवाल, मार्केटींग, व्यवसाय व्यवस्थापन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यक्रम समन्वयक सिध्दार्थ थोरात (मो.9552183038) यांच्याशी दि. 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे. **

No comments: